सुप्रीम कोर्टाच्या निर्णयालाही डोनाल्ड ट्रम्प मानेनात; टॅरिफ युद्धाची घोषणा, जागतिक बाजारपेठेत खळबळ!
Donald Trump on Supreme Court tariff ruling : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकन न्यायव्यवस्था यांच्यातील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. टॅरिफ (आयात शुल्क) लावण्याच्या अधिकारांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयावर ट्रम्प यांनी तीव्र संताप व्यक्त केला. तर या निर्णयाला 'अपमानजनक' आणि 'मूर्खपणाचा' असे म्हणत ट्रम्प यांनी या निर्णयाला हिनवले. विशेष म्हणजे, न्यायालयाच्या या धक्क्यानंतर ट्रम्प यांनी माघार घेण्याऐवजी आपली आक्रमकता वाढवत जागतिक टॅरिफमध्ये १५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे.

सुप्रीम कोर्टाचा निर्णय; ट्रम्प यांचा 'सोशल' हल्ला
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या 'ट्रुथ सोशल' या प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत न्यायालयाच्या निर्णयावर सडकून टीका केली. ते म्हणाले की, न्यायालयाने मर्यादा आणण्याचा प्रयत्न केला असला तरी, या निर्णयामुळे राष्ट्राध्यक्ष म्हणून माझे अधिकार पूर्वीपेक्षा जास्त वाढले आहेत, असा दावा ट्रम्प यांनी केला.
"इतर देश आपले शोषण करत आहेत. जर प्रत्येक परवान्यासोबत शुल्क येते, तर अमेरिका इतर देशांना परवाना शुल्क का आकारू शकत नाही?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हे सर्व टॅरिफ यापूर्वीच्या तुलनेत अधिक कायदेशीर आणि शक्तिशाली पद्धतीने वापरले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.
"न्यायालय चीनच्या बाजूने निकाल देऊ शकते"; ट्रम्प यांची भीती
केवळ टॅरिफच नव्हे, तर इतर घटनात्मक मुद्द्यांवरही ट्रम्प यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. न्यायालय टॅरिफ मुद्द्याच्या पलीकडे जाऊन चीन आणि इतर देशांच्या बाजूने निकाल देऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. १४ व्या घटनादुरुस्तीचा संदर्भ देत ट्रम्प म्हणाले की, हे न्यायालय चुकीच्या निष्कर्षावर पोहोचू शकते आणि जन्मसिद्ध नागरिकत्वाच्या मुद्द्यावरही देशाच्या हिताच्या विरोधात भूमिका घेऊ शकते.
जागतिक टॅरिफमध्ये मोठी वाढ: २१ फेब्रुवारीचा धमाका
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ट्रम्प यांनी तातडीने प्रत्युत्तर दिले आहे. त्यांच्या ताज्या निर्णयामुळे जागतिक व्यापारात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
१० टक्क्यांवरून १५ टक्क्यांवर: सुरुवातीला १० टक्के जागतिक टॅरिफ जाहीर केल्यानंतर, शनिवारी (२१ फेब्रुवारी २०२६) ट्रम्प यांनी हा टॅरिफ वाढवून १५ टक्के केला आहे. ज्या देशांनी दशकांपासून अमेरिकेचे आर्थिक शोषण केले आहे, त्यांच्याविरुद्ध कठोर उपाययोजना करणे हा यामागील मुख्य हेतू असल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
काय होणार परिणाम?
ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापार युद्ध (Trade War) अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. १५ टक्के जागतिक टॅरिफमुळे आयात होणाऱ्या वस्तूंच्या किमती वाढू शकतात, ज्याचा थेट परिणाम जागतिक पुरवठा साखळीवर (Supply Chain) आणि अमेरिकेतील महागाईवर होण्याची शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications