रशियाचा पुन्हा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प पुतिन यांच्यावर संतापले, म्हणाले, आठवड्याला ५००० सैनिक मरताहेत
रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांत गेल्या तीन वर्षांहून अधिक काळापासून युद्ध सुरु आहे. गुरुवारी रशियाने युक्रेनवर पुन्हा एकदा क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने मोठा हल्ला केला. त्यात १२ जणांचा मृत्यू झाला असून ९० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चांगलेच संतापले. त्यांनी सोशल मीडियावर आपला राग व्यक्त करत रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांना थांबण्याचा सल्ला दिला.

रशियाचा मोठा हल्ला
युक्रेनची राजधानी कीवमध्ये रशियाने मोठा हल्ला केला. या हल्ल्यात १२ जणांचा मृत्यू झाला असून ९० जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यामुळे या दोन्ही देशांतील युद्ध आणखी तीव्र होण्याची शक्यता वाढली आहे. रशियाने गुरुवारी पहाटे कीव शहरावर ७० क्षेपणास्त्रे आणि १४५ ड्रोनने हल्ला केला. जुलै २०२४ नंतरचा हा सर्वात मोठा हल्ला होता. या हल्ल्यानंतर निवासी इमारतींचे १३ ठिकाणी नुकसान झाल्याची नोंद आहे. स्वियातोशिन जिल्ह्यातील एका घराच्या ढिगाऱ्याखाली लोक अडकले आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे बचावकार्य सुरु आहे.
ट्रम्प यांचा संताप
या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चांगलेच संतापले. ट्रम्प यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिले आहे की, "पुतिन थांबा! हा हल्ला थांबवा आणि शांतता कराराकडे वाटचाल करा.कीववरील रशियन हल्ल्यांबद्दल मी खूश नाही. हा हल्ला आवश्यक नव्हता. खूप चुकीच्या वेळी हा हल्ला झालाय. दर आठवड्याला ५००० सैनिक मरत आहेत. चला शांतता करार करूया!"
आठवड्याला ५००० सैनिकांचा मृत्यू
ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना हल्ले थांबवण्याचे आवाहन केले. व्लादिमीर, थांबा! दर आठवड्याला ५००० सैनिक मरत आहेत. चला शांतता करार करूया!" असे म्हणत त्यांनी शांतता प्रस्तावावर विचार करण्यास सांगितले. दरम्यान, ट्रम्प प्रशासनाने पॅरिसमध्ये शांतता प्रस्ताव सादर केला. ज्यामध्ये युक्रेनला मोठा त्याग करण्यास सांगितले आहे. त्यात म्हटले आहे की क्रिमिया हा रशियाचा भाग मानला जाईल आणि युक्रेनला मोठे प्रदेश रशियाला द्यावे लागतील.
रशिया-युक्रेनचे म्हणणे काय?
हल्ल्यानंतर युक्रेनचे गृहमंत्री इहोर क्लिमेन्को म्हणाले, "मोठी बचाव मोहीम सुरू आहे. अवशेषाखाली मोबाईल फोन वाजताना ऐकू येतात. सर्वांना बाहेर काढेपर्यंत शोध सुरूच राहील." रशियाच्या राष्ट्रपती कार्यालयाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी बुधवारी सांगितले की, युक्रेनचे संकट खूप गुंतागुंतीचे आहे आणि ते एका रात्रीत सोडवता येणार नाही. ट्रम्प यांचे पश्चिम आशियातील राजदूत स्टीव्ह विटकॉफ रशियाला कधी भेट देतील याची घोषणा रशिया करेल, असे त्यांनी सांगितले.












Click it and Unblock the Notifications