'ट्रम्प नव्हे, आम्ही मिटवलं भारत-पाक युद्ध!' चीनचा मोठा दावा, खरं काय? भारताने काय घेतली भुमिका वाचा
China claims mediation india pakistan war operation sindoor : भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी करण्यात आमची भूमिका महत्त्वाची होती, असा नवा खळबळजनक दावा चीनने केला आहे. विशेष म्हणजे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने "वॉशिंग्टनने अण्वस्त्रधारी शेजाऱ्यांमधील युद्ध रोखले" असे सांगत असतानाच, आता चीनने यात उडी घेतली आहे.
बीजिंगमध्ये आयोजित एका आंतरराष्ट्रीय परिषदेत चिनी परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी हा दावा केला असून, यामुळे जागतिक राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे.

'ऑपरेशन सिंदूर' आणि चीनचा दावा काय?
'वनइंडिया इंग्लिश'नुसार, २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचा बळी गेला होता. याला चोख प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर 'ऑपरेशन सिंदूर' ही मोठी लष्करी कारवाई केली होती.
चीनचे म्हणणे काय?
परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्या मते, चीनने या संघर्षात "वस्तुनिष्ठ आणि न्याय्य" भूमिका घेतली आणि दोन्ही देशांमधील तणाव निवळण्यास मदत केली.
भारताने फेटाळला दावा
भारताने कोणत्याही तिसऱ्या पक्षाची (चीन किंवा अमेरिका) मध्यस्थी स्पष्टपणे फेटाळून लावली आहे. भारताच्या मते, हा वाद दोन्ही देशांच्या लष्करी महानिदेशकांमधील (DGMO) थेट चर्चेनंतर १० मे पासून थांबवण्यात आला.
चीनवर खोट्या माहितीचा आरोप
- अमेरिकेच्या एका आयोगाने नोव्हेंबरमध्ये असा आरोप केला होता की, 'ऑपरेशन सिंदूर' नंतर चीनने भारताच्या विरोधात सोशल मीडियावर खोट्या माहितीचा प्रचार केला होता.
- चीनने कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून भारतीय विमानांचे खोटे अवशेष दाखवणारे फोटो व्हायरल केले होते असेही यात म्हटले आहे.
- भारताला फ्रान्सकडून मिळणाऱ्या 'राफेल' विमानांच्या खरेदीत अडथळे आणणे आणि स्वतःच्या 'J-35' विमानांची जाहिरात करणे, हा यामागचा सुप्त हेतू असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.
भारत-चीन संबंधांचे काय?
परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी तणावाचा उल्लेख केला असला तरी, त्यांनी भारत-चीन संबंधांमध्ये "गती" असल्याचेही सांगितले. ऑगस्टमध्ये तियानजिन येथे होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटना परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण दिल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले. तसेच अमेरिकेच्या व्यापार धोरणांवर आणि ट्रम्प यांच्या जागतिक धोरणांवर त्यांनी टीका केली.












Click it and Unblock the Notifications