अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत बायडेन पिछाडीवर; कोण होणार राष्ट्राध्यक्ष?
अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. अमेरिकेत या निवडणुकीच्या या पदासाठी डेमोक्रॅटिकचे जो बायडेन आणि कंझरव्हेटिव्ह पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प असे तगडे उमेदवार आमनेसामने उभे ठाकले आहेत. नेहमी या उमेदवारांत चर्चा आयोजित केली जाते. यात विकास आणि इतर मुद्द्यावर चर्चा होते. त्यातून राष्ट्राध्यक्ष निवडला जातो.
वादाच्या पहिल्या फेरीत बायडेन आपले काम पटवून देऊ शकत नसल्याने ते पिछाडीवर पडत असल्याची चर्चा आहे. अमेरिकेच्या डेमोक्रॅटिक पक्षात उमेदवारीवरून चिंता पसरली आहे. बायडेन 81 वर्षांचे असून पुन्हा एकदा अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी त्यांचे वय जास्त आहे अशी चिंता अनेक अमेरिकी नागरिकांनी यापूर्वी व्यक्त केली आहे.

निवडणुकीपूर्वी होणाऱ्या वादाची पहिली फेरी गुरुवारी पार पडली. विद्यामान अध्यक्ष व डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन आणि माजी अध्यक्ष व रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प त्यामध्ये सहभागी झाले.
यावेळी ट्रम्प यांना सामना करताना बायडेन अडखळत होते आणि मधूनमधून थांबत होते. दुसरीकडे बायडेन यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना ट्रम्प यांनी अमेरिकेची अर्थव्यवस्था, बेकायदा स्थलांतर आणि 2021 मधील कॅपिलट हिलवरील हल्लाबोल यातील सहभाग याविषयी कथन केले.
बायडेन पराभवाच्या छायेत?
निस्तेज कामगिरीमुळे बायडेन पराभूत होतील, नागरिकांमधील ही भावना वाढीला लागू शकते. याबद्दल डेमोक्रॅटिक पक्षामध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. त्याबरोबरच ट्रम्प यांच्या विजयाची भीती विचारात घेऊन बायडेन यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून बाजूला होण्यासाठी विनंती करण्याच्या मागणीनेही पुन्हा जोर धरला आहे.
ट्रम्प यांच्याशी असा सामना
दरम्यान, या वादादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रक्षोभित करण्याचे प्रयत्न बायडेन यांनी वारंवार उधळून लावले आहेत. ट्रम्प यांना ' हश मनी ' प्रकरणात न्यूयॉर्क कोर्टाने दोषी ठरवण्याची घटना अलीकडेच घडली. त्याचबरोबर त्यांनी पहिल्या जागतिक महायुद्धातील सैनिकांचा केलेला अपमान यासारख्या मुद्द्यांवरून बायडेन यांनी त्यांच्यावर मात करण्याचा प्रयत्न केला.
दुसरीकडे, ट्रम्प यांनी पुन्हा एकदा 2020च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल मान्य करण्यास नकार दिला. तसेच 'कॅपिटल हिल'वर केलेला हल्ला आपल्या संमतीने झाला नव्हता असा दावाही त्यांनी केला.
त्यामुळे आगामी काळात डेमॉक्रॅटिक पक्ष आपला उमेदवार बदलणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर ट्रम्प यांचं पारडं शेवटपर्यंत जड राहत का हे पाहणं महत्वाचं ठरेल. अमेरिकेबरोबरच जगाचे लक्ष या निवडणुकीकडे लागलेले आहे. भविष्यातील अनेक समीकरणं या निवडणुकीच्या निकालावर अवलंबून आहेत.












Click it and Unblock the Notifications