कोण आहेत उषा व्हॅन्स? त्यांचं भारतीय कनेक्शन नेमकं काय आहे?
अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हॅन्स आणि त्यांच्या पत्नी उषा व्हॅन्स पुढील आठवड्यात भारत दौऱ्यावर येणार आहेत. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयानं ही घोषणा केली. मिळालेल्या माहितीनुसार, जेडी व्हॅन्स १८ एप्रिल ते २४ एप्रिल दरम्यान इटली आणि भारताचा दौरा करतील. उपराष्ट्राध्यक्ष कार्यालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष दोन्ही देशांच्या नेत्यांसोबत सामायिक आर्थिक आणि भू-राजकीय प्राधान्यांवर चर्चा करतील.
जेडी व्हॅन्स यांच्या भारत भेटीबाबत, उपराष्ट्राध्यक्ष कार्यालयाने म्हटले आहे की, उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हॅन्स पुढील आठवड्याच्या सुरुवातीला भारताला भेट देतील. उपाध्यक्ष व्हॅन्स त्यांच्या तीन लहान मुलांना - इवान, विवेक आणि मिराबेल यांना भारतात आणू शकतात. नवी दिल्ली व्यतिरिक्त, व्हॅन्स कुटुंब जयपूर आणि आग्रा येथे देखील प्रवास करणार आहे. व्हॅन्स पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील. व्हॅन्स कुटुंब सांस्कृतिक स्थळांवरील कार्यक्रमांना देखील उपस्थित राहतील.

दरम्यान आता उषा व्हॅन्स यांच्या भारताच्या संबंधाबद्दल जाणून घ्यायची सगळ्यांनाच उत्सुकता असते. उषा चिलुकुरी व्हॅन्स या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हॅन्स यांच्या पत्नी आहेत. त्यांचं कुटुंब आंध्र प्रदेशातील वडलुरु गावातील आहे. त्यांचं कुटुंब ५० वर्षांपूर्वी परदेशात स्थायिक झालं. १९८६ मध्ये भारतीय स्थलांतरित पालकांच्या घरी जन्मलेल्या उषा यांच संगोपन सॅन दिएगो इथं झालं. त्या एका प्रसिद्ध अमेरिकन फर्ममध्ये वकील आहेत.
कायद्याच्या अभ्यासानंतर न्यायाधीशांसोबत केलं काम
त्यांनी येल लॉ स्कूलमधून पदवी प्राप्त केली. त्यांनी येल लॉ स्कूलमधून ज्युरिस डॉक्टरची पदवी देखील मिळवली. येल येथे चार वर्षांचा अभ्यास केल्यानंतर, त्यांनी केंब्रिज येथे गेट्स फेलो म्हणून आपलं शिक्षण सुरू ठेवलं, जिथं त्यांनी डाव्या विचारसरणीच्या आणि उदारमतवादी गटांसोबत काम केलं. २०१४ मध्ये त्या नोंदणीकृत डेमोक्रॅट होत्या.
कायद्याचा अभ्यास केल्यानंतर, उषा यांनी अनेक संघीय न्यायाधीशांसोबत काम केलं. यामध्ये मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट्स, न्यायाधीश ब्रेट कॅव्हानॉ आणि न्यायाधीश अमूल थापर यांचा समावेश आहे. त्या २०२४ पर्यंत एका लॉ फर्ममध्ये काम करत होत्या. न्यू यॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, उषा आणि जेडी व्हॅन्स यांची पहिली भेट येल लॉ स्कूलमध्ये झाली आणि २०१४ मध्ये केंटकीमध्ये त्यांचं लग्न झालं. उषा आणि जेडी व्हॅन्स यांना तीन मुलं आहेत.
पतीच्या कामगिरीत उषा यांच महत्त्वाचं योगदान
उषा व्हॅन्स यांनी त्यांच्या पतीच्या कामगिरीत महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. एएनआय नुसार, त्यांनी जे डी व्हॅन्स यांना श्वेत अमेरिकन नागरिकांमधील सामाजिक अधोगतीबद्दलचे त्यांचे विचार व्यवस्थित करण्यास मदत केली. जे डी व्हॅन्स यांच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या हिलबिली एलेगी या पुस्तकासाठी उषा यांची भरपूर मदत झाली होती. जेडी यांनी "येल स्पिरिट गाईड" अशा शब्दांत उषा यांच वर्णन केलं आहे.












Click it and Unblock the Notifications