मोठी बातमी..! कोलकता मर्डर केसमध्ये आरोपी संजय रॉयला आजन्म कारावास; वाचा, कोर्टात काय-काय झाले?
कोलकत्ता येथील आरजी कर मेडिकल काँलेजमध्ये प्रशिक्षित महिला डाँक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या करणाऱ्या आरोपी संजय रॉयला कोर्टाने आजन्म कारावास सुनावला. शनिवारीच कोर्टाने संजय रॉयला दोषी ठरवले होते. आज त्याला शिक्षा जाहीर करण्यात आली. याशिवाय न्यायालयाने त्याला ५० हजारांचा दंडही ठोठावला. कोर्टाने पिडीचेच्या कुटुंबाला १७ लाखांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश पश्चिम बंगाल सरकारला दिले.

काय होते प्रकरण?
कोलकत्ता येथील आरजी कर मेडिकल काँलेजच्या सेमिनार हाँलमध्ये ९ ऑगस्ट २०२४ रोजी प्रशिक्षित महिला डॉक्टरचा मृतदेह आढळला होता. मृतदेहावर अनेक जखमाच्या खुणा होत्या. दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलचा स्वयंसेवक संजय रॉय याला अटक झाली होती. १३ ऑगस्ट २०२४ ला न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिला. आरजी कर हॉस्पिटलचे माजी डीन संदीप घोष आणि घटनेच्या दिवशी ड्यूटीवर हजर असलेले ४ डॉक्टर आणि एका सिव्हील वॉलंटियरसह इतर ६ लोकांची पॉलीग्राफ सत्यशोधन टेस्ट करण्यात आली. त्यातून संजय राँय हाच आरोपी असल्याचे सिद्ध झाले होते.
संजय राॅयचा बचाव
आरोपी संजय रॉयला कोर्टाने शनिवारी दोषी ठरवले होते. कोलकाता येथील सियालदह कोर्टाने १६२ दिवसांनंतर हा निकाल दिला. हा खटला तब्बल पाच महिने चालला. अखेर १८ जानेवारीला आरोपीला दोषी ठरविण्यात आले. मात्र आपल्याला अडकविले जात असल्याचा आरोप, आरोपी संजय रॉय याने केला. आपण कोणताही गुन्हा केलेला नाही. आपल्याला फक्त अडकविले जात असल्याचे संजय रॉय याने कोर्टाला शनिवारीही सांगितले होते. मात्र आज कोर्टाने त्याला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली.
काय म्हणाले कोर्ट?
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने संजय रॉय याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी लावून धरली होती. अखेर विशेष न्यायालयाने आरोपी संजय रॉय याला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. न्यायालयाने ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावला. न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारला मृतांच्या कुटुंबाला १७ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. निकाल देताना हा किरकोळ गुन्हा नसला तरी त्याला दुर्मिळातील दुर्मिळ गुन्हा देखील म्हणता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.












Click it and Unblock the Notifications