2000 च्या नोटांबाबत RBI चा मोठा खुलासा; अजूनही 'एवढ्या' कोटींच्या नोटा परत आल्याच नाहीत
रिझर्व्ह बँकेने शनिवारी २००० रुपयांच्या नोटांबाबत पुन्हा एक मोठी अपडेट दिली. नोटा बदलण्याचा निर्णय घेतल्यानंतर ९८.१८ टक्के नोटा बँकिंग प्रणालीत परत आल्या मात्र ६,४७१ कोटी रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे आहेत, असा दावा रिझर्व बँकेने केला. रिझर्व बँकेने १ मार्चला या नोटांबाबत अपडेट दिली. अजूनही दोन टक्के नोटा या लोकांकडेच असल्याचे रिझर्व बँकेने सांगितले.

दोन वर्षांपूर्वी झाल्या होत्या बाद
दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय १९ मे २०२३ रोजी रिझर्व्ह बँकेने घेतला होता. त्यानंतरही बाजारात ३.५६ लाख कोटी रुपये मुल्याच्या नोटा शिल्लक होत्या. आता २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत त्यातील बऱ्याच नोटा इतर बँकेकडून रिझर्व बँकेकडे परत आल्या. मात्र अजूनही ६४७१ कोटी रुपयांच्या नोटा बाजारात आहेत. या नोटांचे मूल्य बाद झाले तरी, त्या नोटा काही जणांकडे शिल्लक आहेत, असं आरबीआयने स्पष्ट केलं.
काय आहे नवीन अपडेट
७ ऑक्टोबर २०२३ पर्यंत सर्व बँक शाखांमध्ये २००० रुपयांच्या नोटा जमा करण्याची किंवा त्या बदलण्याची सुविधा उपलब्ध होती. तथापि, ही सुविधा अजूनही रिझर्व्ह बँकेच्या १९ इश्यू ऑफिसमध्ये उपलब्ध आहे. ९ ऑक्टोबर २०२३ पासून आरबीआयने त्यांनी ठरवून दिलेल्या बँकांना २००० रुपयांच्या नोटा स्वीकारण्याचे सांगितले होते. मात्र आत्तापर्यंत फक्त ९८.१८ टक्के नोटाच रिझर्व बँकेकडे जमा झाल्या आहेत.
आताही करु शकता परत
दोन हजारांच्या नोटांवर बंदी घातल्यानंतर ७ ऑक्टोंबर २०२३ पर्यंत भारतातील सर्व बँकांना या नोटा स्विकारण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र त्यानंतर रिझर्व बँकेने फक्त १९ कार्यालयात ही सुविधा सुरु ठेवली. काही व्यक्ती व संस्थांनाच नोटा बदलून घेण्याची परवानगी देण्यात आली होती. याशिवाय, सामान्य लोक देशातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून २००० रुपयांच्या नोटा भारतीय पोस्टद्वारे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कोणत्याही कार्यालयात पाठवू शकतात. त्या त्यांच्या बँक खात्यात जमा करू शकतात. २००० रुपयांच्या नोटा कायदेशीर चलनात राहतील, असे त्यांनी सांगितले.












Click it and Unblock the Notifications