हत्येनंतर सोनमचा आणखी एक थरारक कट उघड, कोण होतं दुसऱ्या हत्येच्या टार्गेटवर?
इंदौरमधील व्यावसायिक राजा रघुवंशी यांच्या हत्येप्रकरणातील तपास जसजसा पुढे जातो आहे, तसतशी या प्रकरणातील गुंतागुंत वाढत आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली असली, तरी रोज नवनवीन आणि धक्कादायक तथ्य समोर येत आहेत.

या प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राजाच्या पत्नी सोनम आणि तिचा प्रियकर राज कुशवाह हत्येनंतर आणखी एक खून करण्याच्या तयारीत होते.
दुसऱ्या हत्येचा 'खुलासा': पोलिसांच्या दिशाभूल करण्याचा कट
मेघालय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजा रघुवंशी याच्या हत्येनंतर सोनम आणि तिचा प्रियकर राज कुशवाह यांनी दुसऱ्या हत्येचाही कट रचला होता. त्यांचा उद्देश होता, एका अनोळखी महिलेला ठार मारून तिचा मृतदेह जाळणे.
त्यामुळे पोलिसांना वाटावं की, सोनमही राजासोबतच मृत्यूमुखी पडली आहे. अशा प्रकारे सोनम स्वतःचं अस्तित्व नष्ट करत फरार व्हायची योजना आखत होती. या रहस्यमय आणि अकल्पनीय कटामुळे तपास करणारे पोलीस अधिकारीही अचंबित झाले आहेत.
राज कुशवाह गुन्हेगारी नाट्याचा सूत्रधार
राज कुशवाह या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्याने संपूर्ण योजना आखली होती आणि सोनमने त्याला प्रत्येक टप्प्यावर साथ दिली. पोलिसांकडून करण्यात आलेल्या चौकशीत सोनमने बुरखा घालून मेघालयमधून फरार होण्याचं कबूल केलं आहे. ती इंदोरपर्यंत पोहोचण्यासाठी टॅक्सी, बस आणि ट्रेन अशा विविध वाहतूक साधनांचा वापर करत होती.
हा सुपारी देऊन केलेला खून नव्हता, तर पूर्वनियोजित कट
या हत्याकांडाबाबत अनेकांनी हा सुपारीखून असल्याचा अंदाज व्यक्त केला होता, मात्र पोलीस अधीक्षक विवेक सायम यांनी यास खोडून काढलं. त्यांचं म्हणणं आहे की, हा खून पैशाच्या मोबदल्यात केला गेलेला नाही, तर पूर्ण नियोजनपूर्वक रचलेला होता. सोनमने तिच्या प्रियकर राजसह, त्याच्या मित्रांना या गुन्ह्यात सामील करून घेतलं. हे तिघंही राज कुशवाहचे जवळचे मित्र होते.
राजासाठी तयार करण्यात आले दोन वेगवेगळे प्लान
राजा रघुवंशी याच्या हत्येसाठी दोन प्लान तयार करण्यात आले होते. पहिल्या प्लाननुसार, निसर्गदृश्याचा आनंद घेताना सेल्फी घेण्याचं निमित्त करून त्याला डोंगरकड्यावरून ढकलून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र हा प्रयत्न फसला. त्यामुळे दुसऱ्या प्लाननुसार, त्याला आधीच ठार मारून मग त्याचा मृतदेह खोल दरीत फेकण्याचं ठरवण्यात आलं. पोलीस तपासात हेही उघड झालं की राजने या गुन्ह्याच्या तयारीसाठी आपल्या साथीदारांना ५०,००० रुपये दिले होते.
सोनमचा 'गायब' होण्याचा प्लान
हत्येनंतर सोनमने स्वतःच्या अस्तित्वालाच नष्ट करण्याचा कट रचला होता. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी एका महिलेला ठार मारून तिचा मृतदेह पेटवून देण्याची योजना तयार करण्यात आली होती. पोलिसांना असं वाटावं की, जळून गेलेला मृतदेह सोनमचाच आहे आणि तीही या गुन्ह्यात बळी ठरली. त्यानंतर सोनमने परदेशात पळून जाण्याचाही विचार केला होता, अशी माहिती तपासात समोर आली आहे.
गुन्ह्याच्या मागची पार्श्वभूमी अजूनही गूढ
संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी प्रमुख आरोपींना अटक केली असून, चौकशी सुरू आहे. मात्र, या गुन्ह्याच्या मागे नेमकं काय उद्दिष्ट होतं, सोनम आणि राज यांचं नेमकं नातं किती खोल आहे, आणि या दोघांचं मानसिक संतुलन कसं आहे, याचा तपास पोलीस विविध कोनातून करत आहेत. या गुंतागुंतीच्या गुन्ह्यात आणखी कोणाची भूमिका उघड होते का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.












Click it and Unblock the Notifications