एकीकडे पावसाळी अधिवेशन सुरु होताच PM विदेश दौऱ्यावर; विरोधक म्हणाले- मोदींनी संसदेतील उपस्थिती...
नवी दिल्लीत संसदेचं पावसाळी अधिवेशन सोमवार, २१ जुलै २०२५ पासून सुरू होत असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित विदेश दौऱ्यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
विरोधकांनी, काँग्रेसने, या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. अधिवेशनापूर्वी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीतच विरोधी पक्षांनी सरकारला अनेक मुद्द्यांवरून धारेवर धरलं.
एकंदरीत, महत्त्वाच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधक या मुद्द्यावरून सरकारला सभागृहात घेरण्याचा प्रयत्न करणार हे निश्चित आहे.

'अधिवेशन टाळल्याचा' मोदींवर आरोप!
पावसाळी अधिवेशनापूर्वी, रविवारी (२० जुलै २०२५) झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत ५१ विरोधी पक्षांनी भाग घेतला आणि अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. या बैठकीनंतर काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट निशाणा साधला. या सरकारमध्ये अनुसूचित जाती आणि महिलांवरील अत्याचार वाढले आहेत आणि हे मुद्दे आम्ही सभागृहात जोरदारपणे मांडणार आहोत. त्यांनी सरकारला स्पष्टपणे सांगितलं की, 'ऑपरेशन सिंदूर', बिहार निवडणुका आणि परराष्ट्र धोरण हे मुद्दे सध्या सर्वात महत्त्वाचे आहेत. त्यामुळे पंतप्रधानांनी या बैठकीला आणि अधिवेशनाला उपस्थित राहावं, पण सरकार सभागृह चालवण्याबाबत गंभीर नसल्याचा आरोप त्यांनी केला.
मोदींनी संसदेतील उपस्थिती तपासली पाहिजे?
कॉंग्रेसने आरोप केला की, जेव्हा पंतप्रधानांना माहित होतं की ते या विशिष्ट तारखांना परदेशात असतील, तेव्हा त्यांनी अधिवेशन का बोलावलं?" त्यांनी मोदींच्या संसदेतील उपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, "पंतप्रधानांनी त्यांची उपस्थिती तपासावी, ते लोकसभा आणि राज्यसभेत किती दिवस उपस्थित राहिले आहेत," यावरुन असे दिसते की मोदी लोकशाहीला गांभीर्याने घेत नाहीत, असाही आरोप प्रमोद तिवारी यांनी केला.
पावसाळी अधिवेशन, सरकारची भूमिका काय?
संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवार (२१ जुलै २०२५) पासून सुरू होत आहे. त्यापूर्वी, २० जुलै रोजी सकाळी ११:०० वाजता संसदेच्या मुख्य समिती कक्षात सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती, ज्याचे अध्यक्षपद केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी भूषवले. या अधिवेशनात केंद्र सरकार ८ नवीन विधेयके सादर करण्याची योजना आखत आहे. बैठकीत सरकारने संसदेची प्रक्रिया सुरळीत चालवण्यासाठी राजकीय पक्षांशी चर्चा केली.
पंतप्रधान मोदींचा परदेश दौरा : ब्रिटन आणि मालदीव
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या वेळापत्रकानुसार, ते २३ ते २६ जुलै दरम्यान ब्रिटन आणि मालदीवच्या दौऱ्यावर असतील. २३ जुलै रोजी पंतप्रधान मोदी प्रथम ब्रिटनला पोहोचतील आणि लंडनमध्ये अनेक द्विपक्षीय कार्यक्रमांना उपस्थित राहतील. २४ जुलै रोजी ते ब्रिटनचे पंतप्रधान सर केयर स्टारमर यांची भेट घेणार आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींच्या या भेटीदरम्यान भारत आणि ब्रिटनमध्ये मुक्त व्यापार करार देखील जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.
भारत आणि ब्रिटन या दोन्ही देशांसाठी हा FTA अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे, विशेषतः अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या नवीन टॅरिफ धोरणाला लक्षात घेता.












Click it and Unblock the Notifications