Pahalgam attack : कलमा म्हणजे काय? तो कधी वाचतात? 28 निष्पापांचा बळी घेतल्यावर समोर आले 'हे' प्रश्न
जम्मू काश्मिरमधील पहलगाम येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. हा हल्ला करताना त्यांनी पर्यटकांना कलमा पठण करायला लावले. त्यांना धर्म विचारला. ज्यांना कलमा पठण करता आले नाही, त्यांच्यावर अंदाधूंद गोळीबार करण्यात आला. या दहशतवाद्यांना 'कलमा' चा खरा अर्थ समजला असता, तर त्यांनी अशी घृणास्पद कृत्ये केली नसती, असे आता म्हटले जात आहे. दहशतवाद्यांनी इस्लाम तसेच पवित्र कुराणला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे, असेही काही इस्लामिक नेत्यांचे म्हणणे आहे. या सगळ्या घटनेनंतर कलमा म्हणजे काय? हा प्रश्न समोर येऊ लागला आहे.

कलमा म्हणजे काय?
इस्लाममध्ये कलमाला महत्त्वाचे स्थान आहे. इस्लाम स्वीकारण्यासाठी सर्वात आधी कलमा तैय्यबा वाचणे आवश्यक आहे. कलमा दोन भागात पठण केला जातो. ला इलाहा इल्लल्लाहू मुहम्मदुररसूल्लाही हा पहिला भाग असतो. त्याचा अर्थ "अल्लाहशिवाय कोणीही उपासनेला पात्र नाही. दुसरा भाग म्हणजे मुहम्मद सल्लल्लाहू अलैहि वसल्लम अल्लाहचे रसूल आहेत." म्हणजे अल्लाह हाच तो देव आहे ज्याची मुस्लिम पूजा करतात आणि ज्याच्यापुढे नतमस्तक होतात. इस्लाममध्ये सहा मुख्य कलमे आहेत. ती मदरशामध्ये शिकवली जातात.
काय आहे अर्थ?
अल्लाह विश्वाचा एकमेव निर्माता आहे. तो पालनपोषण करणारा आणि रक्षक आहे. इस्लाममध्ये त्यांच्याशिवाय इतर कोणाचीही पूजा करणे अनिवार्य नाही. अगदी पैगंबर हजरत मोहम्मद यांचीही पूजा केली जात नाही. पैगंबर मुहम्मद हे अल्लाहचे शेवटचे प्रेषित आहेत. ज्याचा उल्लेख पहिल्या कलमाच्या दुसऱ्या भागात, 'मुहम्मदुररसूल्लाही' मध्ये करण्यात आला आहे.
कलमा किती महत्त्वाचा असतो?
इस्लामची स्थापना पैगंबर मोहम्मद यांनी केली होती. त्याचे पाच स्तंभ म्हणजे कलमा, नमाज, रोजा, जकात आणि हज असे आहेत. ज्यापैकी कलमा हा इस्लामचा पहिला सिद्धांत आहे. कलमाचा इस्लामी अर्थ 'शहीद' म्हणजे 'साक्ष' किंवा 'शपथ' असा आहे. इस्लाम स्वीकारणाऱ्या व्यक्तीला इस्लामचा पाया असलेल्या कलमावर दृढ विश्वास ठेवावा लागेल. सहा कलमे इस्लामच्या संपूर्ण संकल्पनेचे वर्णन करतात. यामध्ये कलमा तय्यब, कलमा शहादत, कलमा तमजीद, कलमा तौहीद, कलमा इस्तिगफर आणि कलमा रद्दे यांचा समावेश आहे. हे जीवन आणि मृत्यू, स्वर्ग आणि नरक, अल्लाहची भक्ती, पैगंबरत्वाचा शेवट इत्यादी महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्श करतात.
कलमा कधी पठण केला जातो?
नमाजच्या आधी आणि नंतर, संकटाच्या वेळी, रोजच्या प्रार्थनेत, मृत्यूच्या वेळी, इखाद्याला इस्लाम धर्मात परावर्तीत करताना कलमा पठण केला जातो. याशिवाय कलमा कधीही पठण केला जातो, असेही सांगितले जाते. तुम्ही दिवसा किंवा रात्री कधीही तो म्हणू शकता. कलमा पठण हे अल्लाहला सर्वात प्रिय समजले जाते.












Click it and Unblock the Notifications