१ ऑक्टोबरपासून होणार ६ मोठे बदल! रेल्वे बुकिंग, UPI पेमेंट आणि PAN कार्ड नियमांचा खिशावर थेट परिणाम
सप्टेंबर महिना आता संपत आला आहे आणि नवीन महिना ऑक्टोबर अनेक मोठ्या बदलांसह येत आहे. १ ऑक्टोबर २०२५ पासून लागू होणारे हे बदल तुमच्या खिशावर आणि दैनंदिन जीवनावर थेट परिणाम करतील. स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरांपासून ते रेल्वे तिकीट बुकिंग, पेन्शन नियम, यूपीआय व्यवहार आणि बँकांच्या सुट्ट्यांपर्यंत, प्रत्येक स्तरावर नवीन नियम लागू होतील.

सणासुदीच्या काळात खर्च वाढणे निश्चित आहे, अशा वेळी या बदलांचा परिणाम तुमच्या बजेटवर आणि योजनांवर स्पष्टपणे दिसून येईल. कोणते नियम बदलणार आहेत, ते जाणून घेऊया.
रेल्वे तिकीट बुकिंगचा नवा नियम
गैरव्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वे १ ऑक्टोबरपासून तिकीट बुकिंगचे नियम बदलत आहे. आता रिझर्व्हेशन उघडल्यानंतर पहिल्या १५ मिनिटांत फक्त तेच लोक ऑनलाईन तिकीट घेऊ शकतील, ज्यांचे आधार व्हेरिफिकेशन झालेले आहे. हा नियम IRCTC ॲप आणि वेबसाइटवर लागू होईल, ज्यामुळे खऱ्या प्रवाशांना प्राधान्य मिळेल आणि बनावट बुकिंगला आळा बसेल.
पेन्शनधारकांसाठी नवीन शुल्क लागू
पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने (PFRDA) १ ऑक्टोबरपासून नवीन शुल्क रचना (Fee Structure) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. NPS, UPS, APY आणि NPS Lite खात्यांवर आता PRAN कार्ड आणि वार्षिक मेंटेनन्स चार्ज स्वतंत्रपणे भरावा लागेल. यात किरकोळ बदल करण्यात आले आहेत, ज्यामुळे ग्राहकांच्या खिशावर थोडा परिणाम होईल, पण प्रक्रिया सोपी होईल.
UPI मधून P2P व्यवहार (Transaction) फीचर हटण्याची शक्यता
१ ऑक्टोबर २०२५ पासून UPI मधील P2P कलेक्ट सेवा (Collect Service) पूर्णपणे बंद होईल. याचा अर्थ आता कोणत्याही बँक किंवा पेमेंट ॲपवर 'कलेक्ट रिक्वेस्ट' हे फीचर उपलब्ध नसेल. या फीचरचा उपयोग इतर युजर्सना पैसे पाठवण्याची किंवा बिल भरण्याची आठवण करून देण्यासाठी होत होता, पण फसवणूक करणारे (Fraudsters) याचा गैरवापर करून बनावट रिक्वेस्ट पाठवून लोकांकडून पैसे उकळत होते. सुरक्षा वाढवण्यासाठी आणि फसवणूक थांबवण्यासाठी NPCI ने हे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
LPG सिलेंडरच्या किमतींमध्ये सुधारणा
१ ऑक्टोबरपासून ऑईल मार्केटिंग कंपन्या LPG, CNG आणि PNG च्या किमतींचा आढावा घेतील. स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती एप्रिलपासून स्थिर आहेत, त्यामुळे ग्राहकांना एकतर दिलासा मिळू शकतो किंवा त्यांच्यावरील बोजा वाढू शकतो. सणासुदीच्या काळात सिलेंडरच्या किमतींचा स्वयंपाकाच्या बजेटवर थेट परिणाम होईल.
ऑनलाईन गेमिंगवर आता कठोर नियम लागू
सरकारने ऑनलाईन गेमिंग इंडस्ट्रीबाबत आपला पवित्रा अधिक कठोर केला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीनंतर आता नवीन नियम लागू झाले आहेत. याअंतर्गत, गेमिंग कंपन्यांवर कठोर नजर ठेवली जाईल, जेणेकरून खेळाडूंना कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीपासून आणि गैरव्यवहारांपासून वाचवता येईल. ऑनलाईन गेमिंग अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि जबाबदार बनवणे हा यामागचा उद्देश आहे.
एका PAN वरून अनेक योजनांमध्ये गुंतवणुकीची सुविधा
नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) मध्ये मोठा बदल होणार आहे. १ ऑक्टोबर २०२५ पासून पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाची (PFRDA) नवीन मल्टिपल स्कीम फ्रेमवर्क (MSF) लागू होईल. या बदलानंतर गैर-सरकारी कर्मचारी, कॉर्पोरेट प्रोफेशनल आणि गिग वर्कर्स आता एकाच पॅन नंबरने वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करू शकतील, ज्यामुळे गुंतवणुकीचे पर्याय वाढतील.












Click it and Unblock the Notifications