मोठी बातमी: भारतीय लष्कराला मोठे यश; पहलगाम हल्ल्यातील मुख्य दहशतवादी मारला; तिघांचा खात्मा!
Operation Mahadev Update, Pahalgam terriost Hashim Musa killed : जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगरमधील लिडवास येथे भारतीय सैन्याने 'ऑपरेशन महादेव' अंतर्गत मोठी कारवाई करत सोमवारी (28 जुलै 2025) तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार केले. भारतीय सैन्याच्या चिनार कॉर्प्सने ही माहिती दिली आहे.
या कारवाईत भारतीय लष्कराच्या हाताला मोठे यश आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहलगाम हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असलेला दहशतवादी हाशीम मूसा देखील या ऑपरेशनमध्ये मारला गेला आहे. दरम्यान, यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु, समोर आलेल्या फोटोवरून सदर व्यक्ती हा पहलगाम हल्ल्यातील सूत्रधार असल्याची सांगितले जात आहे.

पहलगाम हल्ल्याचा मुख्य दहशतवादी ठार?
माध्यमांच्या वृत्तानुसार, 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी हाशिम मुसा उर्फ सुलेमान हा देखील ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये सामील आहे. तथापि, याबाबत लष्कराने अद्याप अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही. 'ऑपरेशन महादेव'ची सविस्तर माहिती आज संध्याकाळपर्यंत माध्यमांना दिली जाईल, असे लष्कराच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आलेले आहे.
OP MAHADEV
— Chinar Corps🍁 - Indian Army (@ChinarcorpsIA) July 28, 2025
Contact established in General Area Lidwas. Operation in progress.#Kashmir@adgpi@NorthernComd_IA pic.twitter.com/xSjEegVxra
शस्त्रसाठा जप्त
ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून अमेरिकेत बनवलेले एम४ कार्बाइन, एके-४७, १७ रायफल ग्रेनेड यांसारखी आधुनिक शस्त्रे आणि इतर अनेक संशयास्पद वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे लष्कराच्या वतीने सांगण्यात येत आहे.
गुप्तचर माहितीवर आधारित कारवाई
भारतीय सैन्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर सोमवारी सकाळी परिसरात शोध मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान दूरवरून दोनदा गोळीबाराचा आवाज ऐकू आला. त्यानंतर तात्काळ परिसरात सुरक्षा दलांची तैनाती वाढवण्यात आली.
पहलगाम हल्ला: एक थरारक घटना
22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम शहरापासून 6 किमी अंतरावर असलेल्या ब्यासरण व्हॅलीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप नागरिक ठार झाले होते, तर 16 जण गंभीर जखमी झाले होते.
या हल्ल्यात दहशतवाद्यांनी त्यांच्या धार्मिक ओळखीच्या आधारे पर्यटकांना निवडकपणे लक्ष्य केले होते, ज्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती.
हल्ल्यामागे कोण होते?, एनआयए तपासात उघड!
हल्ल्यानंतर केलेल्या तपासात तीन दहशतवाद्यांची नावे समोर आली होती. 24 एप्रिल रोजी अनंतनाग पोलिसांनी त्यांची रेखाचित्रे (स्केचेस) जारी केली होती. त्यात अनंतनागचा आदिल हुसेन ठोकर, हाशिम मुसा उर्फ सुलेमान आणि अली उर्फ तल्हा भाई या तीन दहशतवाद्यांची नावे होती.
यापैकी मुसा आणि अली हे पाकिस्तानी असल्याचे निष्पन्न झाले होते. विशेष म्हणजे, मुसा हा पाकिस्तानच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपमध्ये कमांडो होता. या तिघांवर प्रत्येकी 20 लाख रुपयांचे बक्षीसही ठेवण्यात आले होते.
एनआयएने अटक केलेल्या दोन आरोपींनीच या तीन दहशतवाद्यांची नावे उघड केली होती की अन्य काही, हे सध्या स्पष्ट झालेले नाही. 'ऑपरेशन महादेव' अंतर्गत ही मोठी कारवाई दहशतवाद्यांविरुद्धच्या भारताच्या कठोर भूमिकेचे द्योतक आहे.












Click it and Unblock the Notifications