Maha Kumbh 2025 : महाकुंभसाठी विशेष गाड्या, भाडेही नाही, जेवणही फुकटं; कुणी केली घोषणा?
प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरु आहे. याच महाकुंभमेळ्यासाठी गोवा सरकारने तीन विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा केली आहे. कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी गोवा सरकारने तेथील भाविकांना मोफत प्रवासाची सुविधा दिली आहे. गोव्यातून उत्तर प्रदेशातील प्रयागराजपर्यंत तीन विशेष गाड्या सोडण्याची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या संदर्भात माहिती दिली.

कधी जाणार मोफत रेल्वे?
गोव्यातून पहिली ट्रेन ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता दक्षिण गोव्यातील मडगाव रेल्वे स्थानकावरून सुटेल. त्यानंतर १३ आणि २१ फेब्रुवारी रोजी मडगावहून प्रयागराजसाठी पुढील दोन रेल्वे जातील, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. प्रत्येक ट्रेन फक्त गोवा आणि प्रयागराज दरम्यान धावेल. त्यात सुमारे १,००० प्रवासी प्रवास करू शकतील. राज्याचे समाजकल्याण मंत्री सुभाष देसाई म्हणाले की, यात्रेदरम्यान यात्रेकरूंना मोफत जेवण आणि रेल्वे प्रवासाची सुविधा दिली जाईल. ते म्हणाले, "या गाड्या ३४ तासांच्या प्रवासानंतर प्रयागराजला पोहोचतील." प्रयागराजला पोहोचल्यानंतर, यात्रेकरूंना राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था स्वतः करावी लागेल.
कोणत्या योजनेअंतर्गत होईल प्रवास?
मंत्री देसाई म्हणाले की, प्रयागराजला पोहोचल्यानंतर २४ तासांच्या आत परतण्यासाठी यात्रेकरूंना ट्रेनमध्ये चढावे लागेल. त्यांनी सांगितले की, या गाड्या 'मुख्यमंत्री देव दर्शन योजने' अंतर्गत चालवल्या जात आहेत. १८ ते ६० वयोगटातील, ज्यांना कोणतीही गंभीर आरोग्य समस्या नाही, असे प्रवासी या गाड्यांमध्ये प्रवास करण्यास पात्र असतील. गोवा सरकारने भाविकांसाठी तीन विशेष मोफत रेल्वेगाड्यांची सोय केली आहे.
कधीपर्यंत आहे कुंभमेळा?
महाकुंभ २०२५ पौष पौर्णिमेच्या दिवशी १३ जानेवारी रोजी सुरू झाला आहे. हे २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीपर्यंत सुरू राहील. आत्तापर्यंत करोडो भाविकांनी या कुंभमेळ्यात स्नानाचा मुहूर्त साधला आहे. अजूनही दोन मुहूर्त बाकी आहेत.












Click it and Unblock the Notifications