सुरक्षा दलांनी 'जैश'च्या 3 दहशतवाद्यांना घेरले; गोळीबार आणि ग्रेनेड हल्ल्याने सिंगपोरा परिसर हादरला
Jaish-e-Mohammed terrorists : जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात रविवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक उडाली. सिंगपोरा भागात पाकिस्तान समर्थित 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेचे तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने ही मोठी मोहीम हाती घेतली आहे. सध्या दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू असून संपूर्ण परिसराला लष्करी वेढा घालण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?
गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिंगपोरा भागातील जंगलात दहशतवाद्यांची हालचाल आढळून आली होती. चतरू परिसरातील सोनार गावाजवळ असलेल्या मंद्राल-सिंघोराजवळ दुपारी एकच्या सुमारास सुरक्षा दल शोध मोहीम राबवत असताना दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला.
ग्रेनेड हल्ला
स्वतःला चहुबाजूंनी वेढलेले पाहून दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या दिशेने ग्रेनेड फेकले. त्यानंतर लष्करानेही चोख प्रत्युत्तर दिले असून अद्याप चकमक सुरूच आहे.
सद्यस्थिती
सुदैवाने आतापर्यंत कोणत्याही जीवितहानीचे वृत्त नाही, मात्र परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली आहे.
लष्कराची 'नवीन रणनीती': बर्फाच्छादित शिखरांवरही प्रहार
काश्मीरमध्ये सध्या 'चिल्लई कलान' हा कडाक्याच्या थंडीचा काळ सुरू आहे. पूर्वी हिवाळ्यात लष्करी कारवाया काही प्रमाणात कमी व्हायच्या, मात्र आता लष्कराने आपली रणनीती बदलली आहे. दहशतवादी बर्फाच्छादित उंच डोंगरांचा आणि घनदाट जंगलांचा सुरक्षित आश्रयस्थान म्हणून वापर करतात. हे लक्षात घेऊन लष्कराने आता उणे तापमानातही ऑपरेशन्स तीव्र केली आहेत. रात्रीच्या वेळी आणि कठीण भूभागात दहशतवाद्यांना शोधण्यासाठी थर्मल इमेजिंग उपकरणे आणि ड्रोन (UAS) प्रणालीचा वापर केला जात आहे. डोडा आणि किश्तवाडच्या डोंगराळ भागात सुमारे ३५ पाकिस्तानी दहशतवादी सक्रिय असल्याचा संशय आहे, त्यांना संपवण्यासाठी ही विशेष मोहीम राबवली जात आहे.
किश्तवाड-डोडा: दहशतवादाचे नवे केंद्र?
गेल्या काही महिन्यांपासून जम्मू विभागातील किश्तवाड, डोडा आणि कठुआ या जिल्ह्यांमध्ये दहशतवादी कारवायांत वाढ झाली आहे. चतरू भागात लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत मोठी चकमक झाली होती. कठुआ जिल्ह्यातही सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांशी दोन हात केले होते. जंगलातील भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेऊन दहशतवादी लपण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु लष्कराच्या भौगोलिक माहिती तंत्रज्ञानामुळे आता कोणताही भाग त्यांच्यासाठी सुरक्षित राहिलेला नाही.












Click it and Unblock the Notifications