केरळमध्ये पुन्हा 'लाल वादळ' की काँग्रेसची सरशी? ओपिनियन पोलचे आकडे समोर; पाहा कोणाला मिळणार सत्ता!
Kerala assembly election 2026 opinion poll results : केरळ विधानसभा निवडणूक २०२६ च्या तारखा जाहीर होताच दक्षिण भारताचे राजकारण तापले आहे. सलग दोनदा सत्ता राखणाऱ्या डाव्या आघाडीसमोर (LDF) यंदा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफने (UDF) कडवे आव्हान उभे केले आहे. वनइंडियाने वृत्तात MATRIZE-IANS च्या ताज्या ओपिनियन पोलचा हवाला दिला आहे, त्यानुसार, केरळमध्ये यंदा 'कांटे की टक्कर' पाहायला मिळणार असून सत्ता स्थापनेसाठी दोन्ही आघाड्यांमध्ये प्रचंड चुरस निर्माण झाली आहे.

ओपिनियन पोलचे प्रमुख निष्कर्ष (एकूण १४० जागा)
या सर्वेक्षणात केरळमधील १४० मतदारसंघांचा कौल घेण्यात आला असून त्याचे आकडे जाणून घेऊया.
- LDF (डावी आघाडी): ६१ ते ७१ जागा (सत्ता स्थापनेसाठी आवश्यक आकड्याच्या जवळ)
- UDF (काँग्रेस आघाडी): ५८ ते ६९ जागा (अत्यंत चुरशीची लढत)
- BJP (भाजप): ०२ जागा (खाते उघडण्याची शक्यता)
प्रादेशिक समीकरणे: कुठे कोणाचे वर्चस्व?
१. दक्षिण केरळ (४८ जागा): या भागात डाव्यांचा (LDF) दबदबा कायम दिसत असून त्यांना २२ ते २५ जागा मिळण्याची शक्यता आहे, तर यूडीएफला १८ ते २२ जागांवर समाधान मानावे लागू शकते.
२. सेंट्रल केरळ (४४ जागा): मध्य केरळमध्ये काँग्रेसप्रणित यूडीएफ आपली ताकद दाखवताना दिसत आहे. येथे त्यांना २१ ते २६ जागा मिळण्याचा अंदाज असून एलडीएफ १७ ते २० जागांपर्यंत मर्यादित राहू शकते.
३. मालाबार क्षेत्र (४८ जागा): या भागात पुन्हा एकदा एलडीएफने आघाडी घेतल्याचे दिसत आहे. त्यांना २२ ते २६ जागा मिळण्याची चिन्हे असून यूडीएफकडून त्यांना तगडे आव्हान मिळत आहे.
निवडणुकीचे कळीचे मुद्दे
यावेळच्या निवडणुकीत शबरीमला मंदिरात महिलांचा प्रवेश आणि हिंदू मतदारांचे ध्रुवीकरण हे मुद्दे कळीचे ठरणार आहेत. एलडीएफने या मुद्द्यावर सावध भूमिका घेत 'यू-टर्न' घेतल्याचे चर्चेत आहे, तर युडीएफने बेरोजगारी आणि महागाईच्या मुद्द्यावर सरकारला घेरले आहे.
केरळ विधानसभा निवडणूक २०२६ : अधिकृत वेळापत्रक
- उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख २३ मार्च २०२६, सोमवार
- उमेदवारी अर्जांची छाननी २४ मार्च २०२६, मंगळवार
- उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २६ मार्च २०२६, गुरुवार
- मतदानाची तारीख (Single Phase) ९ एप्रिल २०२६, गुरुवार
- मतमोजणी आणि निकाल ४ मे २०२६, सोमवार
महत्त्वाची माहिती
- एकूण जागा: १४० विधानसभा मतदारसंघ.
- मतदार: केरळमध्ये एकूण २.७१ कोटी पात्र मतदार या प्रक्रियेत सहभाग घेणार आहेत.
- आचारसंहिता: १५ मार्च रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासूनच संपूर्ण राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.
- विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ: केरळ विधानसभेचा कार्यकाळ २३ मे २०२६ रोजी संपत आहे, त्यापूर्वी नवीन सरकार स्थापन होणे आवश्यक आहे.












Click it and Unblock the Notifications