संपत्ती पासून ते क्रिमिनल केसपर्यंत, जाणून घ्या झारखंडचा सर्वात श्रीमंत आमदार कोण ?
Jharkhand Assembly Election 2024 : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता चांगलीच रंगत आली आहे. भाजप, कॉंग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तर काही उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज ही दाखल करायला सुरुवात केली आहे.
विद्यमान आमदारांच्या संपत्तीपासून ते शिक्षणापर्यंतची प्रत्येक माहिती जाणून घेण्यासाठी लोकांना उत्सुकता वाढली आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) आणि झारखंड इलेक्शन वॉचने संकलित केलेल्या डेटावरून झारखंडच्या विद्यमान आमदारांकडे सरासरी 3.76 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं सांगण्यात आलं आहे.

लोहरदगाचे आमदार रामेश्वर ओराव हे सर्वात श्रीमंत आमदार असून त्यांची संपत्ती 28 कोटी रुपये आहे. त्यांच्या खालोखाल पंकीचे आमदार कुशवाह शशी भूषण मेहता यांचा क्रमांक आहे. त्यांची एकूण संपत्ती 27 कोटी रुपये आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन या झारखंडच्या तिसऱ्या सर्वात श्रीमंत आमदार आहेत. गंडे विधानसभेच्या आमदार कल्पना सोरेन यांच्याकडे 25 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. ज्यात 8.7 कोटी रुपयांच्या जंगम संपत्तीचा समावेश आहे.
झारखंडचे 68 टक्के आमदार करोडपती
दरम्यान झारखंडच्या 74 विद्यमान आमदारांपैकी एकूण 50 म्हणजेच 68 टक्के आमदार कोट्यधीश असल्याचे अहवालात नमूद करण्यात आलं आहे. भाजपच्या 26 पैकी 19 आमदार करोडपती आहेत. तर जेएमएम पक्षाचे 25 पैकी 17 आमदार करोडपती आहेत. काँग्रेसचे 16 पैकी 9 आमदार आणि AJSU पक्षाच्या तीनही आमदारांनी 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती जाहीर केली आहे.
झारखंडमधील 49% आमदारांवर गुन्हे दाखल
या अहवालानुसार 74 विद्यमान आमदारांपैकी 36 म्हणजेच 49 टक्के आमदारांनी आपल्यावर फौजदारी गुन्हे दाखल असल्याचे जाहीर केले आहे. त्यापैकी 26 जणांवर गंभीर गुन्हे दाखल असून दोन आमदारांवर खुनाचे गुन्हे दाखल आहेत. एका विद्यमान आमदारावर बलात्काराचा आरोप आहे. भाजपच्या 26 आमदारांपैकी 13 जणांवर गुन्हे दाखल आहेत. झारखंड मुक्ती मोर्चाच्या 25 आमदारांपैकी 12 आमदारांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल आहेत, तर काँग्रेसच्या 16 आमदारांपैकी 8 जणांवर गुन्हे दाखल आहेत.
झारखंडच्या आमदारांची शैक्षणिक पात्रता
झारखंडच्या 23 आमदारांनी त्यांची शैक्षणिक पात्रता 12 वीपर्यंत असल्याचे जाहीर केले आहे. 47 आमदारांनी आपली पात्रता पदवी किंवा त्याहून अधिक असल्याचे म्हटलं आहे. याशिवाय दोन आमदारांकडे डिप्लोमा असून दोघांनी केवळ साक्षर असल्याचे सांगितले आहे.












Click it and Unblock the Notifications