पीएम मोदींच्या नव्या खासगी सचिव निधी तिवारी कोण आहेत? का होतेय त्यांची चर्चा? वाचा सगळी उत्तरे...
केंद्र सरकारने सोमवारी आयएफएस अधिकारी निधी तिवारी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खाजगी सचिव म्हणून नियुक्ती केली. तिवारी या मोदींच्या १२ व्या खासगी सचिव असतील. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या आदेशानुसार मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने या नियुक्तीला मान्यता दिली. निधी तिवारी सध्या पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून कार्यरत आहेत.

कोण आहेत निधी तिवारी?
निधी तिवारी या २०१४ च्या बॅचच्या भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस) अधिकारी आहेत. निधी तिवारी या सध्या पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून कार्यरत आहेत. २०२२ मध्ये त्यांनी सुरुवातीला अवर सचिव म्हणून काम केले. त्यानंतर ६ जानेवारी २०२३ पासून पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून काम करत आहेत. निधी तिवारी यांनी २०१३ मध्ये नागरी सेवा परीक्षेत ९६ वा क्रमांक मिळवला होता. यूपीएससी (युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन) उत्तीर्ण होण्यापूर्वी त्या वाराणसीमध्ये सहाय्यक आयुक्त म्हणून काम करत होत्या.
सांभाळलीत महत्त्वाची खाती
निधी तिवारी या मुळच्या उत्तर प्रदेशातील वाराणसीमधील मेहमूरगंज येथील आहेत. हा पंतप्रधान मोदीं यांचाच लोकसभा मतदारसंघ आहे. मोदी २०१४ पासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. २०२२ मध्ये त्या पंतप्रधान कार्यालयात अंडरसेक्रेटरी म्हणून रुजू झाल्या. ६ जानेवारी २०२३ पासून त्या उपसचिव म्हणून काम करत आहेत. पंतप्रधान कार्यालयातील त्यांच्या भूमिकेत, त्यांनी परराष्ट्र आणि सुरक्षा बाबींवर लक्ष केंद्रित केले. थेट राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना अहवाल दिला होता. पीएमओमध्ये नियुक्ती होण्यापूर्वी त्या परराष्ट्र मंत्रालयात होत्या. तेथे निःशस्त्रीकरण आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा व्यवहार विभागात त्या काम करत होत्या.
तिवारी पूर्वी कोण होते खासगी सचिव?
आयएफएस निधी तिवारी यांनी पंतप्रधान मोदींच्या खाजगी सचिव होण्यापूर्वी तीन वर्षांहून अधिक काळ पंतप्रधान कार्यालयात काम केले आहे. आयएफएस अधिकाऱ्याच्या अधिकृत नियुक्तीत असे लिहिले आहे की, "मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने सुश्री निधी तिवारी, आयएफएस (२०१४) यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून पंतप्रधानांच्या खाजगी सचिव म्हणून नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. वेतन मॅट्रिक्सच्या लेव्हल १२ मध्ये, सह-टर्मिनस आधारावर किंवा पुढील आदेशापर्यंत, जे आधी असेल ते तात्काळ प्रभावी होईल." निधी तिवारी यांच्यापूर्वी हार्दिक सतीशचंद्र शाह आणि विवेक कुमार हे दोघे पंतप्रधान मोदींचे खाजगी सचिव होते.












Click it and Unblock the Notifications