काय सांगता? 'या' IAS अधिकाऱ्याची झाली 57 वेळा बदली; आता सुरु करणार 'हा' नवीन व्यवसाय
काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांचे पती रॉबर्ट वाड्रा आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील दिग्गज कंपनी डीएलएफ यांच्यातील वादग्रस्त जमीन व्यवहार रद्द करण्याच्या प्रकरणात प्रसिद्धीझोतात आलेले हरियाणाचे आयएएस अधिकारी अशोक खेमका यांनी बुधवारी सेवेतून निवृत्ती घेतली. आपल्या ३४ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांची ५७ वेळा बदली झाली. आपल्या प्रामाणिकपणासाठी ओळखले जाणारे वरिष्ठ आयएएस अधिकारी अशोक खेमका हे आता नवीन व्यवसाय सुरु करणार आहेत.

कोण आहेत अशोक खेमका?
अशोक खेमका यांचा जन्म ३० एप्रिल १९६५ रोजी कोलकाता येथे झाला. त्यांनी १९८८ मध्ये आयआयटी खरगपूर येथून संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये तंत्रज्ञानाची पदवी प्राप्त केली. त्यानंतर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) येथून संगणक विज्ञानात पीएचडी आणि व्यवसाय प्रशासन आणि वित्त या विषयात एमबीए केले. अशोक खेमका हे १९९१ च्या बॅचचे आएएस अधिकारी आहेत. निवृत्तीच्या वेळी ते हरियाणा परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून निवृत्त झाले. डिसेंबर २०२४ मध्ये त्यांनी हा पदभार स्विकारला होता. २०१२ मध्ये काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्याशी संबंधित गुरुग्राम जमीन व्यवहारातील उत्परिवर्तन रद्द केल्यानंतर राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धीच्या झोतात आले होते.
आत्तापर्यंत झाल्या ५७ बदल्या
अशोक खेमका यांची ३४ वर्षांच्या आयएएस कारकिर्दीत ५७ बदली झाली. एखाद्या आयएएस अधिकाऱ्याच्या कारकिर्दीत हा कदाचित विक्रम असेल. मनोहर लाल खट्टर यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन भाजप सरकारच्या पहिल्या कार्यकाळात परिवहन आयुक्त म्हणून त्यांची बदली झाल्यानंतर ते त्या पदावर दहा वर्षे राहिले. आपल्या प्रामाणिकपणामुळे आपल्या एवढ्या बदल्या झाल्या, असेही त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.
ट्विटमुळे आले होते चर्चेत
दोन वर्षांपूर्वी पदोन्नतीच्या फेऱ्यांनंतर खेमका यांनी एक ट्विट केले होते. त्यात त्यांनी लिहिले होते की, "भारत सरकारमध्ये सचिव म्हणून नव्याने नियुक्त झालेल्या माझ्या बॅचमेट्सचे अभिनंदन! हा आनंदाचा प्रसंग असला तरी, स्वतःला मागे सोडल्याबद्दल तेवढीच निराशा आणते. सरळ झाडे नेहमीच आधी कापली जातात. पश्चात्ताप नाही. नव्याने केलेल्या संकल्पाने, मी टिकून राहीन." त्यांचे हे ट्विट चांगलेच चर्चेच आले होते. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत सरासरी दर सहा महिन्यांनी त्यांची बदली झाली.
सुरु करणार नवा व्यवसाय
निवृत्त झाल्यानंतर अशोक खेमका हे आता वकिलीच्या व्यवसायात प्रदार्पण करणार आहेत. वकिलीचा सराव करण्यासाठी बार कौन्सिलकडे अर्ज करणार असल्याचे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले. व्यासपीठ कोणतेही असो, आपण जनतेची सेवा करण्यासाठीच आयुष्यभर कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. सहा महिन्यांत एकदा बदली होणारे अधिकारी म्हणून त्यांची चांगलीच चर्चा सुरु आहे.












Click it and Unblock the Notifications