हुंड्यासाठी सुनेला जाळणाऱ्या सासूला बुरख्यात अटक; सुनेवर ओतले होते रॉकेल, पोलिसांनी कसा रचला सापळा!
Nikki Bhati Murder Case Update : हुंडाबळीची क्रूर आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना ग्रेटर नोएडा येथे घडली आहे. येथील निक्की भाटी हत्याकांडात पोलिसांनी आता मुख्य सूत्रधारांपैकी एक असलेल्या आरोपी सासू दया हिला अटक केली आहे.
निक्कीच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, केवळ ₹३६ लाख हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्याने सासरच्यांनी निक्कीला जिवंत जाळून मारले. या भयंकर गुन्ह्यात सासूने आपल्या मुलाला सक्रियपणे मदत केली, ज्यामुळे 'दया' नावाच्या या महिलेने दाखवलेली क्रूरता पाहून समाज हादरला आहे.

आईची 'गुप्त' भेट आणि पोलिसांचा सापळा
या हृदयद्रावक प्रकरणात निक्कीचा पती विपिन भाटी याला पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती. मात्र, त्याने रविवारी (२४ ऑगस्ट २०२५) पोलिस कोठडीतून पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. या प्रयत्नात झालेल्या एन्काउंटरमध्ये विपिनच्या पायाला गोळी लागून तो जखमी झाला.
याच संधीचा फायदा घेत, गेल्या काही दिवसांपासून फरार असलेली आरोपी सासू दया, आपल्या जखमी मुलाला भेटण्यासाठी ग्रेटर नोएडा येथील रुग्णालयात पोहोचली. इतरांच्या नजरेतून वाचण्यासाठी तिने बुरखा परिधान केला होता. मात्र, पोलिसांना गुप्त माहिती मिळाली आणि त्यांनी सापळा रचून बुरखाधारी दयाला रुग्णालयाच्या परिसरातूनच अटक केली.
मातृत्वाला कलंक: 'दया'ने ज्वलनशील पदार्थ पुरवले
निक्कीची मोठी बहीण कांचन हिने पोलिसांना दिलेल्या जबाबात सासू दयाच्या क्रूर सहभागाचा खुलासा केला आहे. कांचनच्या आरोपानुसार, गुरुवारी (२१ ऑगस्ट २०२५) हा गुन्हा करताना सासू दयाने कोणताही संकोच केला नाही.
कांचनने सांगितले की, सासू दयाने स्वतः ज्वलनशील पदार्थ (रॉकेल) आणले आणि ते मुलगा विपिनला दिले. सर्वांनी मिळून केले. त्यानंतर विपिनने ते निक्कीवर शिंपडले आणि सर्वांनी मिळून तिला जाळून टाकले. हुंड्याच्या मागणीसाठी निक्कीला तिच्या पती आणि सासरच्या लोकांनी जाणूनबुजून जाळून मारले, असे कुटुंबाचे ठाम म्हणणे आहे.
गुन्हा दाखल आणि पुढील तपास
निक्कीची बहीण कांचन हिच्या तक्रारीवरून कासना पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. पोलिसांनी निक्कीचा पती विपिन भाटी, मेहुणा रोहित भाटी, सासू दया आणि सासरे सतवीर यांच्याविरुद्ध हत्येच्या कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. विपिनला अटक झाली आहे, तर आता सासू दयाही पोलिसांच्या ताब्यात आहे.
पोलिस या घटनेच्या सर्व तांत्रिक बाजू आणि कुटुंबातील सदस्यांचे जबाब विचारात घेऊन तपास करत आहेत. इतर फरार आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हुंड्याच्या राक्षसाने एका विवाहित महिलेचा जीव घेतला, मात्र 'दया' नावाच्या आरोपी सासूच्या अटकेमुळे पीडित कुटुंबाला काही प्रमाणात न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.












Click it and Unblock the Notifications