एक्झिट पोलचे अंदाज साफ चुकले, हरियाणात भाजपची ऐतिहासिक कामगिरी, तिसऱ्यांदा सत्ता मिळवणार!
Exit poll predictions clearly wrong, BJP's historic performance in Haryana : हरियाणातील विधानसभेच्या 90 जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर प्रत्येक तासाला नवनवे ट्विस्ट यायला सुरुवात झाली. एक्झिट पोलने वर्तवलेल्या अंदाजात मोठी उलथापालथ झालेली दिसली.
सुरुवातीला काँग्रेसची सत्ता येईल असे वाटत असतानाच दुपारपर्यंत भाजपला बहुमत मिळेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. सकाळी 8 वाजल्यापासून वर्तवण्यात आलेल्या प्राथमिक अंदाजात काँग्रेस एकतर्फी विजयाच्या दिशेने जाईल असे वाटत होते, मात्र हे सर्व अंदाज दुपारपर्यंत चुकीचे ठरत गेले आहेत.

भाजपने अचानक मारली जोरदार मुसंडी
सकाळी काँग्रेस पक्षाने 65 जागांवर मजल मारली होती. तेव्हा भाजप फक्त 17 जागांवर आघाडीवर होती. मात्र त्यानंतर 9:30 वाजताच भाजप स्पर्धेत उतरला आणि दोघांमध्ये दोन जागांचा फरक पडला. सकाळी 9.44 वाजता काँग्रेस व भाजप हे दोन्ही पक्ष ४३-४३ जागांवर समसमान आकडेवारीवर पोहोचले. त्यानंतर मात्र भाजपची बढत वाढतच गेली. त्यानंतर भाजपने थेट 46 जागांपर्यंत मजल मारली.
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार 27 जागांवर भाजपची आघाडी 2 हजारांपेक्षा कमी आहे. येथील चित्र कधीही बदलू शकते. लाडवा मतदारसंघातून सीएम नायबसिंह सैनी तर हिस्सारमधून सावित्री जिंदाल आघाडीवर आहेत. जुलाना मतदारसंघातून विनेश फोगाट मागे पडल्या आहेत.
सध्या काय आहे स्थिती
हरियाणात 5 ऑक्टोबरला मतदान झाले होते. शेवटची आकडेवारी आली तेव्हा तेथे 67.90% मतदान झाल्याचे सांगण्यात आले. मागील निवडणुकीपेक्षा यावेळी 0.03% मतदान कमी झाले. आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली. तेव्हा काँग्रेस आघाडीवर होतं. मात्र जसजशी वेळ पुढे सरकत गेली तसतशी भाजपने जोरदार मुसंडी मारली.
सध्याच्या ताज्या आकडेवारीनुसार भाजप 49 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस 35 जागांवर आघाडीवर आहे. आपला आत्तापर्यंत एकाही मतदारसंघात पुढे जाता आले नाही. तर बसपा एका जागेवर पुढे असल्याचे दिसतेय. सध्याच्या आकडेवारीनुसार पाच अपक्षांनीही जोरदार मुसंडी मारलेली दिसतेय.
एक्झिट पोलचे आकडे चुकले
मतमोजणीपूर्वी देशातील अनेक मोठमोठ्या संस्थांनी निवडणूक निकालाचे एक्झिट पोल वर्तवले होते. त्यांच्या अंदाजानुसार हरियाणा भाजपच्या हातून जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. दैनिक भास्करसह 13 एजन्सींच्या एक्झिट पोलनुसार हरियाणात काँग्रेसचे सरकार स्थापन होण्याची शक्यता व्यक्त केली होती. काँग्रेसला 50 ते 55 जागा मिळू शकतात, असे अनेक सर्वेमधून सांगण्यात येत होते. मात्र सध्या हरियाणाचा कल भाजपच्या बाजूने असल्याचे स्पष्ट दिसत आहे.












Click it and Unblock the Notifications