PM मोदींच्या हस्ते देशातील पहिल्या 'रिंग मेट्रो'चे उद्घाटन; 33,500 कोटींच्या विकासकामांचा धडाका
PM Narendra Modi metro inauguration : आज आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजधानी दिल्लीच्या दळणवळण व्यवस्थेत एक नवीन अध्याय जोडला आहे. पंतप्रधानांनी सुमारे ३३,५०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यामध्ये देशातील पहिल्या 'रिंग मेट्रो' नेटवर्कचे लोकार्पण आणि तीन नवीन मेट्रो कॉरिडॉरच्या पायाभरणीचा समावेश असून, यामुळे दिल्लीकरांचा प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर होणार आहे.

'रिंग मेट्रो'च्या रूपाने दिल्लीला मिळाली देशातील पहिली भेट
पंतप्रधानांनी पिंक लाईनवरील मजलिस पार्क ते मौजपूर-बाबरपूर या १२.३ किमी लांबीच्या नवीन विभागाचे उद्घाटन केले. या विस्तारामुळे दिल्ली मेट्रोच्या नकाशावर देशातील पहिले पूर्णतः कार्यरत 'रिंग मेट्रो' नेटवर्क तयार झाले आहे. याचा सर्वाधिक फायदा उत्तर आणि ईशान्य दिल्लीतील रहिवाशांना होईल. या मार्गावर ९ एलिव्हेटेड स्टेशन्स आहेत. विशेष म्हणजे, यमुना नदीवर मेट्रोचा पाचवा पूल आणि डबल-डेकर व्हायाडक्ट (वर मेट्रो आणि खाली उड्डाणपूल) बांधण्यात आला आहे. या नवीन टप्प्यामुळे पिंक लाईनची एकूण लांबी आता ७१.५६ किमी झाली आहे.
मॅजेन्टा लाईनचा विस्तार: उंचीचा नवा विक्रम
पंतप्रधानांनी दीपाली चौक ते मजलिस पार्क या ९.९ किमी लांबीच्या मॅजेन्टा लाईन विस्ताराचेही उद्घाटन केले. या कॉरिडॉरचा एक भाग २८.३६ मीटर उंचीवर आहे, जो दिल्ली मेट्रोच्या सर्वात उंच विभागांपैकी एक ठरला आहे. यात दीपाली चौक, मधुबन चौक आणि हैदरपूर बादली मोर यांसारख्या ७ महत्त्वाच्या स्थानकांचा समावेश आहे.
फेज ५ (अ) अंतर्गत ३ नवीन कॉरिडॉरची पायाभरणी
भविष्यातील गरजा ओळखून पंतप्रधानांनी तीन नवीन मेट्रो मार्गांची पायाभरणी केली.
रामकृष्ण आश्रम मार्ग ते इंद्रप्रस्थ (९.९ किमी): हा पूर्णपणे भूमिगत मार्ग असेल, जो सेंट्रल व्हिस्टा, भारत मंडपम आणि इंडिया गेट यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांना जोडेल.
एरोसिटी ते ट-१ विमानतळ (२.२६ किमी): गोल्डन लाईनचा हा विस्तार प्रवाशांना थेट विमानतळापर्यंत कनेक्टिव्हिटी देईल.
तुघलकाबाद ते कालिंदी कुंज (३.९ किमी) : हा उन्नत मार्ग फरीदाबाद आणि नोएडा दरम्यानचा प्रवास सोपा करेल.
एनसीआर (NCR) क्षेत्राला मोठा दिलासा
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या मते, या नवीन जाळ्यामुळे केवळ दिल्लीच नाही तर फरीदाबाद, बल्लभगड आणि नोएडा या शहरांमधील प्रवाशांना मोठा फायदा होईल. प्रवाशांना आता गोल्डन लाईनद्वारे थेट विमानतळावर पोहोचणे सोपे होणार आहे.
वुमन डे निमित्त भेट: 9,350 आधुनिक घरे
मेट्रो प्रकल्पांशिवाय पंतप्रधानांनी १५,२०० कोटींच्या जीपीआरए (GPRA) पुनर्विकास प्रकल्पांतर्गत सरोजिनी नगरमध्ये महिलांना नवीन घरांच्या चाव्या सुपूर्द केल्या. सरोजिनी नगर, नेताजी नगर आणि कस्तुरबा नगर येथे आधुनिक सोयीसुविधांनी युक्त ९,३५० फ्लॅट्स बांधले जात आहेत.
पंतप्रधानांचा संदेश: "दिल्ली ही भारताच्या ऊर्जेचे प्रतीक"
या प्रसंगी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "दिल्ली ही केवळ देशाची राजधानी नाही, तर भारताच्या ओळखीचे आणि उर्जेचे प्रतीक आहे. दिल्ली जितकी आधुनिक होईल, तितकाच भारताचा आत्मविश्वास जगासमोर मजबूत होईल." महिला दिनाचा संदर्भ देत त्यांनी राष्ट्र उभारणीत महिलांच्या वाढत्या भूमिकेचे कौतुक केले.












Click it and Unblock the Notifications