आम्हाला फक्त सत्तेत येऊ द्या, वक्फ कायदा उखडून फेकू, एका तासांत...'त्या' नेत्याच्या विधानाने खळबळ
सध्या देशात वक्फ सुधारणा कायदा लागू झाला आहे. या कायद्यानंतर अनेक नेत्यांनी केलेल्या विधानामुळे राजकारण तापले. आता काँग्रेस नेत्याचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. काँग्रेस खासदाराने वक्फ सुधारणा कायद्याबाबत केलेल्या या वक्तव्याची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे.

काय आहे व्हिडीओत?
सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओत, उत्तर प्रदेशच्या सहारनपूर येथील काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांनी एक वादग्रस्त भाष्य केले आहे. खा. मसूद वक्फ विधेयकाबाबत बोलताना म्हणाले की, जर मशिदी नसतील तर नमाज कुठे अदा करायचा? स्मशानभूमि नसेल तर मृतदेह कुठे पुरायचे? ईदगाहचा विषय तर लांबच राहिला. जर असेच चालू राहिले तर, आम्हीही शांत बसणार नाही. आम्ही सत्तेत आलो ना, तर हे सगळं एका तासांत बदलून टाकू. ज्या दिवशी आम्ही सत्तेत येऊ त्या दिवशी हे सगळं उखडून फेकू.
व्हिडीओनंतर खळबळ
इम्रान मसूद यांनी आपल्या भाषणात म्हटले होते की, ही लोकशाही आहे. राजेशाही नाही. ज्या दिवशी आपण सत्तेत येऊ, त्या दिवशी आपण एका तासाच्या आत ते उपटून टाकू. मी एका तासाच्या आत तुमच्यावर उपचार करेन. एका तासात कसे बरे करायचे हे आपल्याला माहिती आहे. त्यांनी संविधानाच्या कक्षेत राहून वक्फ कायद्याला विरोध करण्याचे आवाहन केले होते. जिथे जिथे आमचे सरकार असेल, जिथे जिथे विरोधी पक्ष सत्तेत असतील, तिथे कोणत्याही परिस्थितीत हा कायदा लागू केला जाऊ नये, असेही मसूद यांनी आपल्या भाषणात सांगितले होते. हे भाषण व्हायरल झाल्यानंतर मात्र एकच खळबळ उडाली.
भाजपला थेट आव्हान
जेव्हा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा राजकीय वाद निर्माण झाला. आता इम्रान मसूद यांनी या विधानावर आणि वादावर स्पष्टीकरण दिले आहे. इम्रान मसूद म्हणाले की, त्यांनी कोणालाही इशारा दिलेला नाही. आमचा निषेध भारतीय जनता पक्षाविरुद्ध आहे. कोणत्याही समुदायाविरुद्ध नाही. त्यांनी असेही म्हटले आहे की, माझे संपूर्ण विधान ऐका. आम्ही सत्तेत आलो तर हा कायदा नाकारू असे म्हटले आहे.
वाद वाढणार
इम्रान मसूद म्हणाले की, आम्ही आमच्या निवेदनात असेही म्हटले आहे की हिंसाचाराला स्थान नाही. मुर्शिदाबादच्या घटनेचाही उल्लेख मी केला आहे. आम्ही लोकशाही, कायदा आणि संविधानावर विश्वास ठेवणारे लोक आहोत. व्हायरल झालेला व्हिडिओ हैदराबादचा असल्याचे सांगितले जात आहे. ऑल इंडिया मुस्लिम मिल्ली कौन्सिलच्या कार्यक्रमात मसूद सहभागी झाले होते. तेथच त्यांनी हे विधान केले.












Click it and Unblock the Notifications