संसदेत गुरुवारी 'छावा'चा विशेष शो; पंतप्रधान मोदींसह त्यांचे मंत्रीमंडळ व खासदारही राहणार उपस्थित
छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील छावा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. या चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असतानाच एक मोठी बातमी समोर येत आहे. संसदेतील सदस्यांसाठी गुरुवारी या चित्रपटाचे खास स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले आहे. संसदेतील बालयोगी सभागृहात खासदारांना हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी सोमवारी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री आणि खासदार या विशेष कार्यक्रमाला उपस्थित राहतील.

काय म्हणाले होते मोदी?
दिल्लीतील आखिल बारतीय मराठी साहित्य संमेलनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली होती. त्यात भाषण करताना मोदी यांनी छावा चित्रपटाचे कौतूक केले होते. ते म्हणाले होते की, "महाराष्ट्र आणि मुंबईने मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीला एक नवीन उंची दिली आहे. छावा देशभरात धुमाकूळ घालत आहे. संभाजी महाराजांच्या शौर्याचा परिचय शिवाजी सावंत यांच्या मराठी कादंबरीने या स्वरूपात करून दिला आहे.," असे गौरवोद्गार मोदींनी काढले होते. स्वतः मोदींनी प्रशंसा केल्यानंतर या चित्रपटाची चांगलीच चर्चा झाली होती.
'छावा'ची छप्परफाड कमाई
'छावा' चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रदर्शीत झाला. रविवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील आयपीएल २०२५ मधील मोठा सामना असूनही, सहाव्या आठवड्यातही लोक विकी कौशलची भूमिका असलेला हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये गेले. रविवारी छावाच्या कलेक्शनमध्ये ३१% वाढ झाली. त्याने ४.८ कोटी रुपये कमावले. भारतात त्याची एकूण कमाई ५८३.३५ कोटी रुपये झाली. त्या दिवशी त्याची हिंदी ऑक्युपन्सी १८.८५% होती. जागतिक स्तरावर, चित्रपटाने ७८० कोटी रुपये कमावले आहेत.
संसदेत होणार स्क्रिनिंग
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यांत संसदेत 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपट दाखविण्यात आला होता. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मंत्रीमंडळासह या चित्रपटाच्या विशेष प्रदर्शनाला हजेरी लावली होती . या चित्रपटात गुजरातमधील साबरमती एक्सप्रेसमध्ये ५९ जणांना जिवंत जाळण्यात आलेल्या गोध्रा ट्रेन जळण्याची घटना दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आता येत्या गुरुवारी 'छावा' चित्रपटाचे प्रदर्शन संसदेत करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.












Click it and Unblock the Notifications