Jammu Kashmir : सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, 3 दहशतवादी ठार
Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना यशस्वीपणे ठार केले आहे. परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था असून शोधमोहीम सुरू आहे. बारामुल्ला येथील चक टॉपर क्रिरी पट्टण भागात ही चकमक सुरू आहे.
दरम्यान किश्तवाडमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये आणखी एक चकमक सुरू आहे. याआधी शुक्रवारी किश्तवाडपासून 45 किमी अंतरावर असलेल्या चत्रू भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे दोन जवान शहीद झाले होते. इतर दोन सैनिक गंभीर जखमी झाले असून त्यांना विमानाने उधमपूर येथील कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

चत्रू हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. अश्रफ गिरी यांनी दोन्ही जवानांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. दोन जवानांचे मृतदेह त्यांच्या संबंधित लष्करी तुकड्यांमध्ये पाठवण्यात आल्याचं त्यांनी सांगितले. चत्रूच्या नयद गावाजवळील पिंगनाल दुग्गाडा जंगल परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी ऑपरेशन शाहपुरशाल सुरू केले.
भारतीय सुरक्षा दलाने चार बाजूने घेराव घातल्यानंतर लपलेल्या दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला, त्यात चार जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अचानक झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून लष्कराच्या जवानांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले.
या चकमकींनंतर किश्तवाड आणि डोडा या दोन्ही जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. वाहनांची तपासणी करण्यासाठी अतिरिक्त चौक्या उभारण्यात आल्या असून विविध ठिकाणी सुरक्षा दलांकडून अचानक तपासणी केली जात आहे. चकमकीच्या ठिकाणी अतिरिक्त फौजफाटाही पाठवण्यात आला आहे.
पडिहरना येथे झालेल्या चकमकीनंतर दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले होते. काही दहशतवादी किश्तवाडमध्ये काही काळापासून मोठ्या हल्ल्याची योजना आखत असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. अलीकडेच पडिहरनाच्या नवंथू भागात दहशतवादी दिसले होते, जिथे चकमक झाली होती, परंतु दोन दिवसांपूर्वीच बसंतगढमध्ये सुरक्षा दलांनी दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार केले होते. या घटनेपूर्वी बुधवारी उधमपूरच्या बसंतगडमध्ये सुरक्षा दलांनी आणखी दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. या ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज डोडा दौरा
केंद्रशासित प्रदेशात (UT) अशा दहशतवादी कारवाया महत्त्वाच्या आणि चिंताजनक आहेत. कारण या ठिकाणी विधानसभा निवडणुका होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी आज यूटीला भेट देणार आहेत. विधानसभा निवडणूकीसाठी पंतप्रधान मोदी एक स्टार प्रचारक देखील आहेत. ते डोडा येथील क्रीडा स्टेडियमवर निवडणूक प्रचार सभेला संबोधित करणार आहेत.
निवडणुकीच्या घोषणेनंतर यूटीमध्ये पंतप्रधानांची ही पहिली रॅली असेल. यानंतर ते 19 सप्टेंबरला श्रीनगरलाही जाणार आहेत. केंद्रीय मंत्री आणि भाजप निवडणूक प्रभारी (जम्मू आणि काश्मीर) यांनी सांगितले की, देशाच्या पंतप्रधानांनी 1982 मध्ये डोडाला शेवटची भेट दिली होती. जम्मू-काश्मीरमध्ये तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात बारामुल्ला, कुपवाडा आणि बांदीपोरा जिल्ह्यात 1 ऑक्टोबर 2024 रोजी मतदान होणार आहे.












Click it and Unblock the Notifications