मोठी बातमी: गँगस्टर अनमोल बिश्नोईचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण; सिद्दीकी, मूसेवाला हत्येचा आरोप!
भारतातील संघटित गुन्हेगारी क्षेत्रासाठी एक मोठी घडामोड समोर आली आहे. कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण केले जात आहे.
अनमोल बिश्नोई याच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या, पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांची हत्या आणि अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे.

बाबा सिद्दीकी हत्याकांडात अनमोलची थेट भूमिका
१२ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री ९:३० वाजता मुंबईतील वांद्रे (खेरवाडी सिग्नल) येथे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. लॉरेन्स टोळीने या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. ह्या हत्येमध्ये अनमोल बिश्नोईचा सहभाग कसा उघड झाला. या प्रकरणात उत्तर प्रदेशातील हरीश कुमार आणि धर्मराज कश्यप, हरियाणामधील गुरमेल बलजीत सिंग आणि पुण्यातील प्रवीण लोणकर यांना अटक करण्यात आली आहे.
झीशान अख्तरचा सहभाग
आरोपींच्या चौकशीतून जालंधर येथील रहिवासी झीशान अख्तर याचे नाव समोर आले. गोळीबाराच्या वेळी तो घटनास्थळी उपस्थित होता. जर गोळीबार करणाऱ्यांनी सिद्दीकीला मारण्यात अपयश आले, तर झीशान सिद्दीकीवर गोळी चालवणार होता.
अनमोलशी संपर्क
घटना घडत असताना झीशान अख्तर हा सतत लॉरेन्सचा भाऊ अनमोल बिश्नोई याच्याशी फोनवरून संपर्कात होता. सिद्दीकी यांच्या मृत्यूनंतर, झीशानने अनमोलला घटनास्थळाचे फोटो आणि व्हिडिओ पाठवून हत्येच्या वृत्ताला दुजोरा दिला आणि त्यानंतर तो फरार झाला.
सलमान खान आणि मूसेवाला हत्येशी कनेक्शन
अनमोल बिश्नोईचे नाव केवळ बाबा सिद्दीकी हत्याकांडातच नव्हे, तर इतर हाय-प्रोफाइल गुन्ह्यांमध्येही जोडले गेले आहे. अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणाची जबाबदारी अनमोल बिश्नोईने स्वीकारली होती. पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येमध्येही अनमोल बिश्नोईचे नाव प्रमुख आरोपींमध्ये समाविष्ट आहे.
एनआयएच्या 'मोस्ट वॉन्टेड' यादीत समावेश!
अनमोल बिश्नोईवर असलेली गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता, राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) त्याच्यावर कठोर कारवाई केली आहे. अलीकडेच एनआयएने अनमोल बिश्नोईवर माहिती देणाऱ्यासाठी १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. २०२२ मध्ये नोंदवलेल्या दोन गुन्हेगारी प्रकरणांमध्ये एजन्सीने अनमोलविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे.
गुन्हेगारी इतिहास
लॉरेन्स टोळीतील 'भानू' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनमोलविरुद्ध २०१२ मध्ये पंजाबमध्ये पहिला गुन्हा दाखल झाला होता. २०१५ पर्यंत त्याच्यावर सहाहून अधिक गुन्हे दाखल झाले. सध्या अनमोलविरुद्ध देशभरात २२ गुन्हे दाखल आहेत, ज्यात खून, लक्ष्य हत्या, खंडणी आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या विविध कलमांचा समावेश आहे.
अमेरिकेतील अटकेनंतर आता अनमोल बिश्नोईचे भारतात प्रत्यार्पण होत असल्याने, या सर्व हाय-प्रोफाइल गुन्ह्यांच्या तपासाला गती मिळणार असून लॉरेन्स बिश्नोई टोळीविरुद्धच्या कारवाईत हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.












Click it and Unblock the Notifications