सावधान, मेट्रिमोनियल साईड वापरताय..? 'त्याने' लग्नाचे आमिष दाखवून केलाय 15 महिलांवर अत्याचार
मोठ्या घरचा असल्याचे व दिल्ली क्राइम ब्रॅन्टचा सायबर सुरक्षा अधिकारी असल्याचे भासवून एका २६ वर्षिय तरुणाने तब्बल १५ महिलांवर लैंगिक अत्याचार केला. विशेष म्हणजे या तरुणाने मेट्रिमोनियल साईटद्वारे या सगळ्यांना आपल्या जाळ्यात ओढले होते. गुजरातच्या अहमदाबाद येथून वसईच्या वालीव पोलिसांनी हिमांशु योगेशभाई पंचाल याला अटक केली.

नेमके काय घडले?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंचाल याने मॅट्रिमोनियल वेबसाईटवर स्वतःची बनावट प्रोफाइल तयार केली होती. दिल्ली क्राईम ब्रँचच्या सायबर सुरक्षा विभागाचा अधिकारी असल्याचे त्याने दाखवले होते. तसेच आपण श्रीमंत घराण्यातील असून अनेक मालमत्ता त्याच्या नावावर असल्याचा बनाव केला होता. या साईटवरुनच तो महिलांशी संपर्क साधायचा. त्यांचा विश्वास संपादन करायचा. नंतर या महिलांना वसई, मुंबई किंवा अहमदाबाद येथील हॉटेलवर बोलवायचा. तिथे त्यांना नकली हिरे जडित दागिने भेट देत लग्नाचे आमिष दाखवायचा आणि पहिल्याच भेटीत त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचा. शरीरसंबंध ठेवलेल्या काही महिलांकडून, त्याने नंतर पैसे उकळल्याचेही समोर आले आहे.
कशी फुटली वाचा?
6 फेब्रुवारीला मीरा रोड येथील एका 31 वर्षीय महिलेने वालीव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पंचालने मॅट्रिमोनियल साइटवर आपल्याशी संपर्क साधून एक बनावट हिऱ्याचे नेकलेस भेट दिले. तिने वसई आणि अहमदाबादमधील दोन हॉटेल्सची माहिती पोलिसांना दिली, जिथे त्याने तिच्यावर लैगिक अत्याचार केल्याचा आरोप केला. या तक्रारीनंतर पंचालच्या फसवणुकीचा पर्दाफाश समोर आला.
अहमदाबादमधून अटक
वालीव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी सांगितले की, पंचाल हा अत्यंत चांगला इंग्रजी बोलणारा आणि गोड बोलून महिलांना आकर्षित करणारा गुन्हेगार आहे. त्याच्याकडे पाच मोबाइल फोन आणि एक अॅपल लॅपटॉप होता. तो नेहमी हॉटेलचे वायफाय आणि व्हॉट्सअॅप कॉलिंगचा वापर करत असे. तांत्रिक तपासानंतर आम्ही त्याला अहमदाबाद येथून अटक केली, असे सानप यांनी सांगितले. पोलिस आता पंचालच्या इतर बळी पडलेल्या महिलांचा शोध घेत असून, त्याच्या विरुद्ध अधिक तपास सुरू आहे.












Click it and Unblock the Notifications