फायद्याची गोष्ट! 5 लाखावरील उपचारांसाठी सरकार देणार मदत; कोणत्या गंभीर आजारासाठी कसा लाभ मिळेल? वाचा
Maharashtra government health scheme : राज्य सरकारने राज्यातील गरीब आणि गरजू रुग्णांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. यापुढे विस्तारित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत ५ लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च येणाऱ्या ९ प्रकारच्या दुर्मिळ आजारांवरील उपचारांसाठी निधी उपलब्ध होणार आहे. आतापर्यंत, या योजनांमध्ये ५ लाख रुपयांपर्यंतचेच आरोग्य संरक्षण मिळत होते, त्यामुळे यकृत, फुफ्फुस किंवा हृदय प्रत्यारोपणासारख्या महागड्या उपचारांसाठी रुग्णांना मोठा आर्थिक भार सहन करावा लागत होता.

कसा मिळणार या योजनेचा लाभ?
मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार, या योजनांच्या माध्यमातून रुग्णांच्या उपचारांसाठी मिळणाऱ्या निधीपैकी २०% रक्कम राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या राखीव निधीसाठी वापरली जाईल. याच राखीव निधीतून ५ लाखांपेक्षा जास्त खर्च असलेल्या उपचारांसाठी मदत केली जाईल. यामुळे, गरजू रुग्णांना आर्थिक मदतीअभावी उपचारांपासून वंचित राहावे लागणार नाही.
यासाठी ठराविक उपचार आणि त्यांच्यासाठी मिळणारी मदत खालीलप्रमाणे आहे.
- हृदय प्रत्यारोपण: ₹१५ लाख
- फुफ्फुस प्रत्यारोपण: ₹२० लाख
- हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण: ₹२० लाख
- यकृत प्रत्यारोपण: ₹२२ लाख
- अस्थिमज्जा प्रत्यारोपण: ₹९.५ लाख ते ₹१७ लाख
- ट्रान्स कॅथेटर एऑर्टिक व्हॉल्व्ह इम्प्लांटेशन (TAVI) आणि रिप्लेसमेंट (TMVR): ₹१० लाख
रुग्णालयांनाही मिळणार एवढा निधी
राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या या महत्त्वपूर्ण 'आरोग्यदायी' निर्णयामुळे केवळ रुग्णांनाच नव्हे, तर सरकारी रुग्णालयांनाही मोठा फायदा होणार आहे. उपचारांतून मिळणाऱ्या निधीपैकी ८०% रक्कम संबंधित रुग्णालयांना दिली जाईल. या रकमेचा उपयोग रुग्णालयातील पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी, औषधे आणि सामग्री खरेदी करण्यासाठी, तसेच डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी केला जाणार आहे. यामुळे सरकारी आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम आणि कार्यक्षम बनण्यास मदत होईल.
आरोग्य सचिवाच्या अध्यक्षेतेखाली विशेष समिती
या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समितीही नेमण्यात आली आहे, जी उपचारांच्या दरांमध्ये बदल करणे आणि निधीच्या योग्य विनियोगासाठी कार्यपद्धती निश्चित करेल. हा निर्णय महाराष्ट्रातील आरोग्य सेवेसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे.
हेही वाचा : Ayushman Vay Vandana: आयुष्मान कार्ड कसे डाऊनलोड करावे, 5 लाख रुपयांचे आरोग्य विमा कवच कसे मिळवावे?
हेही वाचा : AI Health एआय आजच सांगेल, 10 वर्षांनी तुम्हाला कोणता आजार होऊ शकतो! कॅन्सर, हृदयविकार समजेल का? वाचा












Click it and Unblock the Notifications