सरकारचा इशारा.. डाॅक्टर, कर्मचारी आरोग्य केंद्रात उपस्थित नसल्यास कारवाई! 334 खासगी रुग्णालयावर बंदी
Legislative Session 2025 : डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपस्थित राहणं बंधनकारक आहे. त्यांना तिथे राहता यावं यासाठी निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे.ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर उपस्थित नसतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज विधानसभेत सांगितलं.
राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात बऱ्याचदा डाॅक्टर अन् कर्मचारी गैरहजर असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. यासह वेळेवर डाॅक्टर किंवा रुग्णसेवा देणारे कर्मचारी उपस्थित नसल्यास रुग्णांची मोठी तारांबळ उडाल्याचेही यापुर्वी घडले आहे, ही बाब लक्षात घेता आज आज विधीमंडळ अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासात अभिजित पाटील यांनी याविषयी प्रश्न विचारला होता, त्यावर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी उत्तरं दिली.

दरपत्रक न लावणाऱ्या ३३४ खासगी रुग्णालयावर बंदी
प्रकाश आबिटकर सभागृहात निवेदन करताना म्हणाले, दरपत्रक न लावणाऱ्या तसंच इतर नियम न पाळणाऱ्या ३३४ खासगी रुग्णालयांवर बंदी घातली आहे. एकूण २३ हजार ३५४ रुग्णालयांची तपासणी करण्यात आली, यातल्या ४ हजार ८०७ रुग्णालयांना नोटीस बजावल्याचं आबिटकर यांनी सांगितलं. आरोग्य विभागाकडून दरवर्षी रुग्णालयांची तपासणी केली जाईल. तसंच बॉम्बे नर्सिंग ॲक्ट मध्ये सुधारणा करण्यासाठी पुढच्या अधिवेशनात विधेयक आणलं जाईल असं आबिटकर म्हणाले. प्रशांत बंब, मनोज जामसुतकर यांनी याविषयी प्रश्न विचारला होता.
आशा स्वंयसेविकांचे मानधन वाढणार का?
काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकाचं गेल्या पाच ते सहा महिन्यांचं मानधन प्रलंबित असल्याबाब प्रश्न उपस्थित केला. तसंच आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांची मानधन वाढ केली जाणार आहे का असा प्रश्न विचारला. यावर मानधन यापुढे प्रलंबित राहणार नाही, असं आश्वासन सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिलं.
काय म्हणाले हसन मुश्रीफ?
गोंदिया जिल्ह्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालया अंतर्गत येणाऱ्या बाई गंगाबाई रक्तपेढीत ब्लड कंपोनंट युनिट कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक यंत्रं खरेदी केले आहेत, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत दिली. त्यासाठी पूरक यंत्रसामुग्रीची खरेदी आणि दुरुस्ती सुरू असून अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे परवाना मिळवण्यासाठी कार्यवाही सुरू आहे असं मुश्रीफ म्हणाले. राजकुमार बडोले यांनी याविषयी प्रश्न विचारला होता. रक्तपेढीत ब्लड कंपोनंट युनिट नसल्याने आवश्यक रक्तघटकांचा पुरवठा होत नाही अशी तक्रार त्यांनी केली होती.












Click it and Unblock the Notifications