तुम्हाला लाल रंगाची लघवी होतेय का?, मग वेळीच सावध व्हा!, 'या' गंभीर आजाराचा आहे इशारा!
Red urine causes and treatment : मानवी शरीरात होणारे छोटे छोटे बदल आपल्याला अनेकदा मोठ्या आजारांचे संकेत देत असतात. त्यामुळे वारंवार ताप येणे असेल किंवा वारंवार खोकला येणे हे जर होत असेल तर त्वरीत आपण डॉक्टरांचा सल्ला घेत असतो. असाच एक मानवी शरीरातील एक बदल मोठ्या आजाराचे संकेत देत असतो. तो म्हणजे तुमच्या लघवीत झालेला रंगाचा बदल. सामान्यतः लघवीचा रंग हलका पिवळा किंवा पारदर्शक असतो, पण जर त्यात लाल रंग दिसू लागला तर त्याकडे दुर्लक्ष करणे खूप धोकादायक ठरू शकते. कारण, हे गंभीर आजाराचे प्रथम लक्षण मानले जाते.

लघवीचा लाल रंग: कारणे आणि धोके
लघवीचा रंग लाल होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. काही वेळा बीट, बेरी यांसारखे पदार्थ खाल्ल्याने किंवा विशिष्ट औषधे घेतल्यानेही लघवीचा रंग बदलतो. पण जर हा रंग रक्तामुळे येत असेल, तर त्याला वैद्यकीय भाषेत हेमॅटुरिया म्हणतात. ही स्थिती अनेक गंभीर आरोग्य समस्यांचे लक्षण असू शकते.
डॉक्टरांच्या मते, लघवीमध्ये रक्त येण्याची काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत.
मूत्रपिंडातील दगड (Kidney Stones): मूत्रपिंडात किंवा मूत्रमार्गात असलेले दगड मूत्रमार्गाला दुखापत करतात, ज्यामुळे रक्तस्राव होऊ शकतो.
मूत्रमार्गातील संसर्ग (UTI): मूत्रपिंडात किंवा मूत्राशयात झालेल्या संसर्गामुळे जळजळ होते आणि रक्तस्राव होऊ शकतो.
मूत्राशय किंवा मूत्रपिंडाचा कर्करोग : अनेकदा सुरुवातीच्या टप्प्यात कर्करोगाचे एकच लक्षण दिसते, ते म्हणजे लघवीतून रक्त येणे.
मूत्रपिंडाचे आजार : जेव्हा मूत्रपिंड योग्य प्रकारे काम करत नाही, तेव्हा लघवीचा रंग बदलतो.
अंतर्गत दुखापत : शरीराच्या अंतर्गत भागांमध्ये झालेली दुखापत किंवा रक्त गोठण्याची समस्या देखील याला कारणीभूत असू शकते.
डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?
जर तुमच्या लघवीचा लाल रंग 1-2 दिवसांत सामान्य झाला नाही, किंवा त्यासोबत खालीलपैकी कोणतीही लक्षणे असतील तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज आहे. जसे की, तीव्र वेदना होणे,लघवी करताना जळजळ होणे, ताप कायम राहणे, तुमचे वजन कमी होणे, वारंवार लघवीला जावे लागणे, अशा वेळी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला जरूर घेणे गरजेचे आहे.
प्रतिबंध आणि घ्यायची काळजी
काही सोप्या उपायांनी तुम्ही तुमच्या मूत्रमार्गाचे आरोग्य चांगले ठेवू शकता.
पुरेसे पाणी प्या: दररोज पुरेसे पाणी पिल्याने मूत्रपिंडाचे आरोग्य चांगले राहते.
निरोगी आहार: संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या.
मर्यादित सेवन: दारू आणि जास्त मीठ खाणे टाळा.
दुर्लक्ष करू नका: वारंवार होणाऱ्या मूत्रमार्गाच्या संसर्गाकडे दुर्लक्ष करू नका.
नियमित तपासणी: वेळोवेळी आरोग्य तपासणी करत राहा.
लघवीचा लाल रंग ही एक किरकोळ बाब नाही. हे अनेक गंभीर आजारांचे लक्षण असू शकते. त्यामुळे, असे कोणतेही लक्षण दिसल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. लक्षात ठेवा, वेळेवर घेतलेली काळजी भविष्यातील मोठ्या धोक्याला टाळू शकते.
(अस्वीकरण : कृपया वरील माहिती केवळ ज्ञान म्हणून दिलेली आहे, यात कोणताही आरोग्य सल्ला नाही, तुम्हाला अशा प्रकारचा त्रास होत असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा)












Click it and Unblock the Notifications