अतुल परचुरेंच्या पश्चात कोण, त्यांची पत्नी काय करतात, मराठी सिनेसृष्टीचे किती झाले नुकसान, वाचा
मराठी रंगभूमी तसेच मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील ख्यातनाम अभिनेते म्हणजे अतुल परचुरे यांचे 57 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांना कॅन्सरचे निदान झाले होते. त्यांच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण कलाविश्वाला धक्का बसला. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी आणि आई असा परिवार आहे. अतुल यांना कर्करोगाने घेरले होते. मात्र या संपूर्ण आजारामधून ते सुखरुप बाहेर पडले होते. पुन्हा त्यांनी अभिनयक्षेत्रात दमदार कमबॅक केलं. कामाला नव्याने सुरुवात करत असताना त्यांच्यावर उपचारही सुरु होते. आज दि. 15 रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मराठीसह हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक कलावंतांची अंत्यंसंस्काराला उपस्थिती होती.
मुलाखतीमध्ये दिली होती धक्कादायक माहिती
अतुल परचुरे यांनी काही महिन्यांपूर्वीच एक मुलाखत दिली होती. ज्यामध्ये त्यांनी एक धक्कादायक माहिती दिली होती. त्यांनी मुलाखतीत सांगितलं होतं की, 'जेव्हा त्यांना कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे समजली तेव्हा ते डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेले पण सुरुवातीला डॉक्टरांनी त्यांच्या आजाराचे चुकीचे निदान केले आणि त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळू लागली.

यकृतामध्ये 5 सेंटीमिटरची गाठ
त्यावेळी अतुल परचुरे म्हणाले, लग्नाच्या 25 व्या वाढदिवसानिमित्त मी कुटुंबीयांसह ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला गेलो होतो. काही दिवसांनी मला काहीही खाण्यास त्रास होऊ लागला होता. मला मळमळ व्हायची. माझ्या भावाने मला काही औषधे दिली पण उपयोग झाला नाही. त्यानंतर डॉक्टरांनी अल्ट्रासोनोग्राफी केली. मला समजले की, काहीतरी चुकीचं घडतंय. डॉक्टरांनी सांगितले की माझ्या यकृतामध्ये सुमारे 5 सेंटीमीटरची गाठ आहे, आणि ती कर्करोगाची गाठ आहे. त्यावेळी मी डॉक्टरला विचारलं की, मी बरा होईन की नाही तेव्हा त्यांनी मी एकदम बरा होईल असं सांगितलं होतं.
मुख्यमंत्री शिंदेंनीही वाहिली श्रद्धांजली
मुख्यमंत्री शिंदे यांनी एक्स पोस्ट करत अतुल परचुरेंना श्रद्धांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी म्हणाले, चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट, रसिक प्रेक्षकांना कधी खळखळून हसवणारे, कधी डोळ्यात आसू उभे करणारे. कधी अंतर्मुख करणारे अभिजात अभिनेते अतुल परचुरे यांचे अकाली निधन वेदनादायी आहे. अतुल परचुरे यांनी बालरंगभूमीपासू्नच आपली देदिप्यमान अभिनय कारकीर्द गाजवली. नाटक, चित्रपट, मालिका या तिन्ही क्षेत्रात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. तरुण तुर्क म्हातारे अर्क, नातीगोतीसारखी नाटकं असोत किंवा पु. ल. देशपांडे यांचा शाब्दिक, वाचिक विनोद असो, अतुल परचुरे यांनी आपल्या अंगभूत गुणांनी त्यात गहिरे रंग भरले.मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी उत्तम व्यक्तिरेखा साकारल्या. त्यांच्या जाण्यामुळे मराठीतला एक अभिजात अभिनेता हरपला आहे. हे नुकसान भरुन येण्यासारखे नाही. परचुरे यांच्या हजारो चाहत्यांपैकी एक या नात्याने कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. हे दु:ख सहन करण्याचं बळ ईश्वर त्यांना देवो. राज्य सरकारच्या वतीने मी त्यांना श्रध्दांजली वाहतो.
हे त्यांचे नावाजलेले चित्रपट!
अतुल परचुरे यांनी अनेक अभिनेते, दिग्दर्शक, कलाकारांसह काम केले. वासूची सासु, प्रियतमा, तरुण तुर्क म्हातारे अर्क या नाटकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी सह-अभिनेता म्हणूनही काम केले. सलाम-ए-इश्क, पार्टनर, ऑल द बेस्ट: फन बिगिन्स, खट्टा मीठा, बुढ्ढा होगा तेरा बाप अशा हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले. याशिवाय 'जागो मोहन प्यारे' मालिकेतील त्यांच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केले.
या नाटकांमध्ये केले काम?
कापूसकोंड्याची गोष्ट, गेला माधव कुणीकडे, तरुण तुर्क म्हातारे, तुझं आहे तुजपाशी, नातीगोती, व्यक्ती आणि वल्ली, टिळक आणि आगरकर या प्रसिद्धी नाटकांमध्ये त्यांनी काम केले. त्यांचे पात्र अजरामर झाले.
अतुल परचुरे कुटुंब
अतुल परचुरे यांच्या जाण्याने सिनेसृष्टीवर शोककळा पसरलेली आहे. मराठी इंडस्ट्रीत मुख्यत्वे काम करण्यासाठी ओळखला जाणारा अभिनेता कॅन्सरशी झुंज देत होता. पण, कर्करोगाच्या लढाईनंतर तो पूर्णपणे बरा झाला. मात्र, अलीकडेच या अभिनेत्याची तब्येत बरी नसल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
अतुल परचुरे यांची पत्नी कोण आहे?
अतुल परचुरे यांचा विवाह सोनिया परचुरे यांच्याशी झाला आहे. त्या एक प्रसिद्ध नृत्यांगना आहे. सोनिया परचुरे भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (ICCR) च्या पॅनेल सदस्यांपैकी एक आहेत. ती ICCR मध्ये परफॉर्मिंग आर्टिस्ट देखील आहे. त्यांनी वयाच्या 6 व्या वर्षी नृत्य प्रवासाला सुरुवात केली. त्यांनी श्रीमती पुनम मुर्डेश्वर यांच्यासोबत 15 वर्षे काम केले आहे आणि कथ्थक या नृत्य प्रकारात प्रभुत्व मिळवले आहे. त्यांच्या गुरुवर्य डॉ. मंजिरी देव आणि पद्मश्री गोपी कृष्ण यांच्या मार्गदर्शनाखाली कथ्थकमध्ये प्रभुत्व मिळवले आहे.
अतुल परचुरे यांची मुलगी कोण आहे?
सखील परचुरे ही अतुल परचुरे यांची मुलगी आहे. ती फॅशन स्टायलिस्ट आहे. ती स्वतःला "व्हिंटेज इन प्रचलित" म्हणते. पेपरमिंट बॉम्बे आणि द आर्ट्स स्पेस मुंबईच्या त्या मालक आहेत. सखील तिच्या कुटुंबाच्या जवळ असल्याचे दिसते आणि अनेकदा त्यांच्यासोबतचे फोटो अपलोड करत असते.












Click it and Unblock the Notifications