कोण होता खतरनाक गाझीबाबा? इम्रान हाश्मी- सई ताम्हणकरच्या 'ग्राऊड झीरो'ची का होतेय चर्चा? वाचा
इम्रान हाश्मीचा 'ग्राउंड झिरो' हा चित्रपट येत्या शुक्रवारी २५ एप्रिलला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरही महत्त्वाच्या भुमिकेत दिसणार आहे. २००१ साली भारतीय संसदेवर झालेल्या हल्लाचा मास्टमाईंड जैश-ए- मोहम्मदचा खतरनाक अतिरेकी गाझीबाबाचा खात्मा कसा केला, या कथेवर हा चित्रपट आधारीत आहे. त्या रात्री काय-काय घडले होते, हे या चित्रपटात पहायला मिळणार आहे.

इम्रान- सईच्या प्रमुख भुमिका
'ग्राउंड झिरो' या चित्रपटात इमरान हाश्मी एका बीएसएफ अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. बीएसएफचे अधिकारी नरेंद्रनाथ दुबे यांनी गाझीबाबाला मारण्यात महत्त्वपूर्ण भुमिका निभावली होती. तेच पात्र इम्रान हाश्मीने साकारले आहे. मराठमोळी सई ताम्हणकर त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय झोया हुसेन आणि रजत कपूर यांनी देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत.
सई ताम्हणकरची भूमिका काय?
या चित्रपटात सई ताम्हणकर इम्रान हाश्मीच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. चित्रपटात त्याचे पात्र एक भावनिक दृष्टिकोन दर्शवते. युद्ध आणि दहशतवादाविरुद्धची लढाई केवळ सैनिकांपुरती मर्यादित नाही, तर त्यांच्या कुटुंबांवरही त्याचा खोलवर परिणाम होतो, हे सईने दाखवले आहे. सईने तिच्या भूमिकेत सूक्ष्मता आणि सहजता दाखवली आहे. ज्यामुळे हा चित्रपट आणखी वास्तववादी बनला आहे.
काय आहे कथानक?
'ग्राउंड झिरो' हा चित्रपट भारताच्या सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) एका महत्त्वाच्या मिशनचे वर्णन आहे. २००१ च्या भारतीय संसद हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेला धोकादायक जैश-ए-मोहम्मद दहशतवादी गाझी बाबा मारला गेला. त्याला मारण्याचा बीएसएफचा प्लॅन त्याला मारण्यासाठी केलेले प्रयत्न, या चित्रपटात दाखविण्यात आले आहेत.
कोण होता गाझी बाबा?
राणा ताहिर नदीम उर्फ गाझीबाबा हा जैश-ए-मोहम्मदचा एक कुख्यात कमांडर होता. २००१ च्या संसद हल्ल्यासह भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये तो सहभागी होता. पाकिस्तानात लपून तो दहशत पसरवत होता. भारतीय सुरक्षा दलांसाठी तो एक मोठा धोका होता. त्याच गाझीबाबाला मारण्याचा प्लॅन बीएसएफने केला होता. तो यशस्वीही झाला होता.
कसा मारला गाझीबाबा?
गाझीबाबा याने २००१ मध्ये भारतीय संसदेवर हल्ला केला. त्यानंतर गुप्तचर संस्था व बीएसएफने त्याच्याविरोधात प्लॅनिंग केले. बीएसएफ अधिकारी नरेंद्रनाथ दुबे यांच्या नेतृत्वाखाली दोन वर्षांनी म्हणजेच २००३ मध्ये गाझीबाबाला संपविण्यासाठी एक गुप्त ऑपरेशन राबवण्यात आले. श्रीनगरमधील नूरबाग येथे गाजीबाबा लपण्याची माहिती बीएसएफला मिळाली होती. पहाटे ४:१० वाजता बीएसएफने गाझीबाबाला संपविण्याचे ऑपरेशन सुरु केले. अतिरेक्यांना ही खबर लागताच जोरदार गोळीबार करण्यात आला. स्फोटही घडविण्यात आले. अखेर बीएसएफ टीमने गाझीबाबाला ठार केले. या मोहिमेत एक सैनिक शहीद झाला तर नरेंद्र देखील गंभीर जखमी झाले होते.












Click it and Unblock the Notifications