विजय-रश्मिकाच्या लग्नाची घटिका भरली! या दिवशी रंगणार सोहळा; पाहुण्यांपासून ते रिसेप्शनपर्यंत, वाचा
Vijay Deverakonda wedding date : सिनेसृष्टीतील सर्वात लोकप्रिय जोडी विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांच्या लग्नाच्या चर्चांनी आता जोर धरला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत असल्याच्या अफवांनंतर, आता हे जोडपे २६ फेब्रुवारी रोजी विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती समोर येत आहे. उदयपूरच्या नयनरम्य वातावरणात हा शाही सोहळा पार पडणार असल्याचे वृत्त आहे.

विमानतळावरील लूकने वेधले लक्ष
नुकतेच विजय आणि रश्मिका हैदराबाद विमानतळावर जवळपास एकाच वेळी स्पॉट झाले. विशेष म्हणजे रश्मिकाच्या कपाळावरील 'बिंदी' आणि दोघांनीही मास्क व चष्म्याने चेहरा झाकल्यामुळे चाहत्यांच्या मनात शंका अधिक गडद झाली. हा निव्वळ योगायोग नसून लग्नाच्या तयारीसाठीच हे जोडपे रवाना झाल्याचे मानले जात आहे.
रश्मिकाची ती 'एक' कमेंट आणि चर्चांना उधाण
ज्येष्ठ पत्रकार सुभाष के. झा यांनी सोशल मीडियावर या जोडप्याचे अभिनंदन करणारी पोस्ट शेअर केली होती. विशेष म्हणजे, या पोस्टवर रश्मिकाने कोणतीही सारवासारव न करता थेट "धन्यवाद" असे उत्तर दिले. अभिनेत्रीच्या या एका शब्दामुळे त्यांच्या लग्नावर शिक्कामोर्तब झाल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे, जरी अद्याप अधिकृत पत्रक जाहीर झालेले नाही.
उदयपूरमध्ये शाही तयारी : 117 खोल्या बुक!
मिळालेल्या माहितीनुसार, उदयपूरमधील आलिशान 'आयटीसी मोमेंटोस' (ITC Mementos) हॉटेलमध्ये लग्नाचे विधी पार पडणार आहेत. साधारण 230 खास पाहुण्यांसाठी व्यवस्था करण्यात आली असून 24 ते 26 फेब्रुवारी दरम्यान हॉटेलमधील 117 खोल्या बुक केल्या आहेत.
हैदराबादमधील एका प्रसिद्ध वेडिंग प्लॅनरकडे लग्नाची जबाबदारी असून दिल्लीतील एका लोकप्रिय बँडला सादरीकरणासाठी निमंत्रित केले आहे. लग्नात "नो फोन पॉलिसी" असण्याची शक्यता आहे, जेणेकरून खाजगी क्षण सुरक्षित राहतील.
व्हायरल पत्रिका आणि रिसेप्शनचे नियोजन
सोशल मीडियावर एक लग्नपत्रिका व्हायरल होत असून त्यावर 26 फेब्रुवारी ही तारीख नमूद आहे. राजस्थानमध्ये खाजगी पद्धतीने लग्न उरकल्यानंतर, हे जोडपे हैदराबादमध्ये चित्रपटसृष्टीतील मित्रमंडळींसाठी भव्य रिसेप्शन देणार आहे. ३ किंवा ४ मार्च रोजी हैदराबादमध्ये एका मोठ्या सोहळ्याचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे, जिथे दाक्षिणात्य आणि बॉलिवूडमधील दिग्गज उपस्थित राहतील.
चाहत्यांसाठी आनंदाची बातमी
जर हे वृत्त खरे ठरले, तर दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील हे सर्वात मोठे लग्न ठरेल. 'डिअर कॉम्रेड' आणि 'गीता गोविंदम'मधील या जोडीला प्रत्यक्ष आयुष्यात एकत्र पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत.












Click it and Unblock the Notifications