सुशांत सिंह राजपूतची पवित्र रिश्ता नाही, तर 'या' मालिकेतून झाली होती सुरुवात; वाचा त्याचे खास किस्से
Sushant singh rajput birth anniversary : बॉलिवूडचा उमदा आणि हरहुन्नरी अभिनेता सुशांत सिंह राजपूत आज आपल्यात नसला, तरी त्याच्या अभिनयाने आणि स्मितहास्याने तो चाहत्यांच्या मनात कायम घर करून आहे. आज, २१ जानेवारी रोजी सुशांतची जयंती. बिहारमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात २१ जानेवारी १९८६ रोजी जन्मलेल्या सुशांतने आपल्या मेहनतीच्या जोरावर टिव्ही ते बॉलिवूड असा यशस्वी प्रवास केला. 'पवित्र रिश्ता' या मालिकेने त्याला घराघरात 'मानव' म्हणून ओळख दिली, पण अनेकांना त्याच्याबद्दलच्या काही खास गोष्टी माहीत नाहीत. त्याच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊया त्याच्याशी संबंधित काही न ऐकलेले किस्से.

'पवित्र रिश्ता' नव्हे, तर 'या' मालिकेतून केले होते पदार्पण
बहुतेक लोकांना असे वाटते की, सुशांतने एकता कपूरच्या 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. पण हे खरे नाही. त्याची अभिनयाची सुरुवात 'किस देश में है मेरा दिल' या मालिकेपासून झाली होती, ज्यामध्ये त्याने एक छोटी भूमिका साकारली होती. मात्र, त्याला प्रचंड लोकप्रियता आणि खरी ओळख 'पवित्र रिश्ता' मालिकेमुळेच मिळाली. यानंतर त्याने 'काय पो छे'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि 'छिछोरे', 'शुद्ध देसी रोमान्स', 'पीके' आणि 'एम.एस. धोनी' यांसारखे दमदार चित्रपट दिले.
अभ्यासात प्रचंड हुशार आणि नॅशनल ऑलिम्पियाडचा विजेता
सुशांत सिंह राजपूत केवळ एक उत्तम अभिनेताच नव्हता, तर तो अभ्यासातही अत्यंत हुशार होता. त्याने मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेतला होता, पण अभिनयाच्या वेडापायी त्याने शिक्षण अर्धवट सोडले. तो इतका कुशाग्र होता की, त्याने ११ पेक्षा जास्त इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केल्या होत्या. इतकेच नाही, तर तो भौतिकशास्त्रात 'नॅशनल ऑलिम्पियाड'चा विजेताही होता.
चित्रपटगृहात चेहरा लपवून बसायचा
सुशांतबद्दलचा हा किस्सा खूप कमी लोकांना माहीत आहे. जेव्हा त्याचा कोणताही चित्रपट प्रदर्शित व्हायचा, तेव्हा तो सामान्य प्रेक्षकांप्रमाणे चेहरा लपवून चित्रपटगृहात जायचा. चित्रपट संपल्यानंतर तो अचानक चाहत्यांसमोर येऊन त्यांना सरप्राईज द्यायचा. त्याची हीच साधी आणि मनमोकळी शैली चाहत्यांना खूप आवडायची.
चंद्रावर जमीन खरेदी करणारा पहिला अभिनेता
सुशांतला खगोलशास्त्रात (Astronomy) प्रचंड आवड होती. त्याने एक अत्याधुनिक दुर्बीण (Telescope) खरेदी केली होती, ज्यामधून तो रात्री तास न् तास चंद्र आणि तारे पाहत असे. त्याची ही आवड इतकी होती की, तो चंद्रावर जमीन खरेदी करणारा पहिला भारतीय अभिनेता ठरला होता.












Click it and Unblock the Notifications