मोठी बातमी! अभिनेता अल्लू अर्जुनच्या घरासमोर दगडफेक; 'त्या' राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांची धरपकड
दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या हैदराबाद येथील ज्युबली हिल्स येथील घराबाहेर अज्ञात लोकांनी दगडफेक केली. या जमावाने अल्लू अर्जुनच्या घरासमोर निदर्शनेही केली. या प्रकारामुळे काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते. दरम्यान, पोलिसांनी तातडीने एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना अटक केल्याची माहिती, सूत्रांकडून मिळत आहे.

कालच झाली होती टिका
अल्लू अर्जूनच्या 'पुष्पा-2' या चित्रपटाच्या प्रिमिअर शोदरम्यान चेंगराचेंगरीचा प्रकार घडला होता. मोठ्या संख्येने आलेल्या चाहत्यांच्या गर्दीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अल्लू अर्जुनने या प्रकाराबाबत माफी मागत त्या कुटुंबाला आर्थिक मदतही केली. मात्र तेलंगणाचे सीएम रेवंत रेड्डी व एमआयएमचे आमदारअकबरुद्दीन ओवैसी यांनी शनिवारी थेट विधानसभेत त्याच्यावर टिका केली. अभिनेता या गंभीर घटनेनंतरही बेफिकीर होता. मृत्यू झाल्याचे सांगितल्यानंतरही तो थिएटरबाहेर जात नव्हता, असे रेवंत रेड्डी यांनी विधानसभेत सांगितले. दुसरीकडे, माझ्या माहितीप्रमाणे हा एवढा प्रकार होऊन व त्या अभिनेत्याला समजूनही तो हसत होता, अशी टिका अकबरुद्दीन ओवैसी यांनी केली होती.
अल्लू अर्जुनने मांडली बाजू
या दोन्ही नेत्यांनी टिका केल्यानंतर कालच अल्लू अर्जुननेही पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. तो म्हणाला, या घटनेबाबत मी यापूर्वीच दुःख व्यक्त केले आहे. मात्र माझी बदनामी करण्याचे प्रकार सुरु आहेत. मी कुणाचेही नाव घेत नाही, मात्र हे प्रकार थांबले पाहिजेत, अशी भूमिका त्याने पत्रकार परिषदेत मांडली. माझ्याबद्दल कुणीतरी जाणून-बुजून चुकीची माहिती पसरवत आहे, असा आरोपही अल्लू अर्जुनने काल पत्रकार परिषदेत केला होता.
अज्ञातांची दगडफेक
दरम्यान, आज अल्लू अर्जुनच्या हैदराबाद येथील घरावर आज काही लोकांनी दगडफेक केली. निदर्शनेही केली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जात परिस्थिती हाताळली. काही लोकांची धरपडक करुन अटकही केल्याची माहिती मिळत आहे. मात्र हे लोक कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत का, याचा शोध सध्या पोलिसांकडून सुरु आहे.












Click it and Unblock the Notifications