भाईजान सलमानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांनी घेतली गंभीर दखल
मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानला पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे. गँगस्टर लॉरेन्स विश्नोई हा सलमान खानला सातत्याने धमक्या देत आहे. भाईजानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची उघड धमकी मिळाली आहे. ट्रॅफिक कंट्रोलला पाठवलेल्या मेसेजमध्ये धमकी देण्यात आली आहे. संदेश देणाऱ्याने स्वतःला लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या जवळचा असल्याचं सांगितलं आहे. लॉरेन्स बिश्नोईसोबतचा दीर्घकाळ चाललेला वाद मिटवण्यासाठी सलमान खानकडून 5 कोटी रुपयांची मागणी करणारा धमकीचा संदेश मुंबई वाहतूक पोलिसांना मिळाला आहे.
मुंबई वाहतूक पोलिसांना पाठवला मेसेज
सलमान खानने 5 कोटी रुपये न दिल्यास त्याची अवस्था माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्यापेक्षा वाईट होईल, अशी धमकी बिश्नोई टोळीकडून आलेल्या संदेशात देण्यात आली आहे. 12 ऑक्टोबर 2024 रोजी बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. मुलगा झीशानच्या मुंबईतील वांद्रे भागातील कार्यालय समोर त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

बिश्नोई टोळीने 5 कोटी रुपयांची मागणी केली आहे. मेसेजमध्ये लिहिले आहे, हे हलक्यात घेऊ नका. सलमान खानला जिवंत राहायचे असेल आणि लॉरेन्स बिश्नोईशी असलेले वैर संपवायचे असेल तर त्याला 5 कोटी रुपये द्यावे लागतील. तसे केले नाही तर त्यांची अवस्था बाबा सिद्दीकीपेक्षाही वाईट होईल. मुंबई पोलीसांनी धमकी संदेशची गंभीर दखल घेतली आहे. सलमान खानच्या या धमकीला गांभीर्याने घेत असून हा व्हॉट्सॲप मेसेज पाठवणाऱ्यांचा शोध घेत आहेत. लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने बाबा सिद्दिकीच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे.
बाबा सिद्दीकी हे राजकारणी असण्यासोबतच बॉलिवूड इंडस्ट्रीशीही संबंधित आहेत. अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी त्याच्या खूप जवळ होते. ज्यात सलमान खान, शाहरुख खान आणि संजय दत्त यांची नावे आहेत. अनेकदा ते खास प्रसंगी बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी पार्टी आयोजित करत असे. त्यांच्या निधनाची बातमी आल्यानंतर संपूर्ण इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.
सलमान खानच्या सुरक्षेत वाढ
बाबा सिद्दिकीच्या हत्येनंतर संपूर्ण देशभऱात खळबळ उडाली आहे. त्यांच्या हत्येनंतर सलमान खानच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली. सलमानला वाय प्लस दर्जाची सुरक्षा सरकारने दिली आहे. सलमानच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वांद्रेतील सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट्स बाहेर 24 तास पोलिसांचा खडा पहारा आहे. सीसीटीव्ही कॅमेराच्या मदतीनेही सुरक्षेवर कडक नजर ठेवली जात आहे. बँडस्टँड आणि गॅलेक्सी अपार्टमेंट्च्या परिसरात काही पोलीस अधिकारी साध्या ड्रेसमध्ये तैनात करण्यात आले आहेत.












Click it and Unblock the Notifications