नेहा कक्कर आणि रोहनप्रीतचा घटस्फोट? 'त्या' एका पोस्टमुळे उडाली खळबळ; अखेर गायिकेने सोडले मौन
Neha Kakkar divorce rumours : बॉलीवूडची लोकप्रिय गायिका नेहा कक्कर सध्या तिच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. नेहा आणि तिचा पती रोहनप्रीत सिंग यांच्यात बिनसल्याच्या आणि ते घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांनी सोमवारी जोर धरला होता. या अफवांना खुद्द नेहाच्याच एका सोशल मीडिया पोस्टने खतपाणी घातले होते. मात्र, आता नेहाने या सर्व प्रकरणावर जाहीर स्पष्टीकरण देत सत्य समोर आणले आहे.

नेमकं प्रकरण काय? 'ती' पोस्ट आणि अफवांचा बाजार
सोमवारी नेहा कक्करने इन्स्टाग्रामवर एक भावूक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये तिने म्हटले होते की, "मला जबाबदाऱ्या, नाती आणि कामातून ब्रेक हवा आहे. मी कधी परत येईन किंवा परत येईन की नाही, हे मला ठाऊक नाही." नेहाची ही पोस्ट काही वेळातच व्हायरल झाली आणि चाहत्यांमध्ये खळबळ उडाली. नेहाने ही पोस्ट नंतर डिलीट केली असली, तरी तोपर्यंत नेटकऱ्यांनी तर्क-वितर्क लढवायला सुरुवात केली होती. अनेकांनी असा दावा केला की, नेहा आणि रोहनप्रीतच्या वैवाहिक आयुष्यात तणाव असून ते घटस्फोटाच्या उंबरठ्यावर आहेत.
"माझ्या निष्पाप पतीला ओढू नका"; नेहाने दिले चोख प्रत्युत्तर
अफवांचे पेव फुटलेले पाहून नेहाने पुन्हा एकदा एक लांबलचक पोस्ट लिहित घटस्फोटाच्या बातम्यांचे खंडन केले. तिने स्पष्ट केले की, तिचा राग कुटुंबावर किंवा पतीवर नसून अन्य काही कारणांमुळे ती त्रस्त होती.
नेहाने आपल्या पोस्टमध्ये काय म्हटले?
"मित्रांनो, कृपया माझ्या निष्पाप पतीला किंवा माझ्या प्रेमळ कुटुंबाला यात ओढू नका! ते खूप चांगले लोक आहेत आणि मी आज जे काही आहे ते त्यांच्या पाठिंब्यामुळेच आहे. मी इतर काही लोक आणि सिस्टीमवर नाराज आहे. मला आशा आहे की तुम्ही हे समजून घ्याल आणि माझ्या कुटुंबाला यापासून दूर ठेवाल."
नेहाला आपल्या चुकीची जाणीव झाली असून ती पुढे म्हणाली, "मी मान्य करते की सोशल मीडियावर इतके भावनिक व्हायला नको होते. कारण 'तिळाचा डोंगर' कसा करायचा हे मीडियाला चांगलेच माहित आहे. मी माझा धडा शिकले आहे."
ऋषिकेशच्या गल्लीतून बॉलीवूडच्या शिखरापर्यंत
नेहा कक्करचे आयुष्य हे संघर्षातून यशाकडे जाण्याचे एक मोठे उदाहरण आहे. ६ जून १९८८ रोजी ऋषिकेशमध्ये जन्मलेल्या नेहाची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. अवघ्या ४ व्या वर्षी नेहाने मातेच्या जागरणात गाणे सुरू केले. नेहा, तिची बहीण सोनू कक्कर आणि भाऊ टोनी कक्कर यांनी दिल्लीच्या रस्त्यांवर गाऊन कुटुंबाला आधार दिला. २००६ मध्ये 'इंडियन आयडल'ने तिला ओळख दिली. जरी ती शो जिंकली नाही, तरी तिच्या आवाजाने तिने प्रेक्षकांच्या मनात घर केले. आज नेहा कक्कर ही हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या गायिकांपैकी एक आहे. ऑक्टोबर २०२० मध्ये तिने रोहनप्रीत सिंगशी लग्न केले आणि तेव्हापासून ही जोडी चाहत्यांची आवडती जोडी राहिली आहे.












Click it and Unblock the Notifications