इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर व पुणे 'लॉ' ची विद्यार्थीनी शर्मिष्ठा पानोलीस अटक; जाणून घ्या प्रकरण काय?
Instagram Influencer Sharmistha Panoli Arrest : कोलकाता पोलिसांनी हरियाणातील गुरुग्राम येथून इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर आणि पुणे लॉ युनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी शर्मिष्ठा पानोली हिला अटक केली आहे.
तिने ऑपरेशन सिंदूरुवरुन बॉलीवूड कलाकारांच्या मौनावर एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्यात तिने एका विशिष्ट धर्मावर आक्षेपार्ह टिप्पण्या केल्याने तिच्यावर कारवाईची मागणी झाली. अखेर तिला गुरुग्राम पोलिसांनी अटक केली आहे.
इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर शर्मिष्ठा पानोली हिच्याविरुद्ध विविध ठिकाणी तक्रारी दाखल झाल्या होत्या. दरम्यान, तिच्या व्हिडिओवरील तक्रारीनंतर कोलकाता पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर तिला आणि तिच्या कुटुंबाला नोटीस बजावण्यात आली. परंतु ते फरार झाले. त्यानंतर न्यायालयाने तिचे अटक वॉरंट जारी केले. अखेर पोलिसांनी तिला अटक केली आहे.
नेमकं संपूर्ण प्रकरण काय आहे, तिच्यावर काय आरोप आहेत, त्या व्हिडिओत नेमकं काय वादग्रस्त विधान शर्मिष्ठा पानोली हीने केले, याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया...!

काय आहे शर्मिष्ठा पानोली प्रकरण?, जाणून घ्या टाइमलाईन
गुरुग्राम पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शर्मिष्ठा पानोली हीने ऑपरेशन सिंदूरवर बॉलीवूड कलाकारांच्या मौनावर इंस्टाग्रामवर प्रश्न उपस्थित केले होते.
ती म्हटली की, चित्रपटांमध्ये देशासाठी आपले प्राण अर्पण करण्याबद्दल बोलणारे 3-4 बॉलीवूड कलाकार आहेत. पण जेव्हा प्रत्यक्षात संधी आली, देशासाठी उभे राहण्याची, सैनिकाला पाठिंबा देण्याची, तेव्हा त्यांच्या तोंडून एकही शब्द निघाला नाही. ते कलाकार मोठे ढोंगी आहेत. त्यांना तर आता लाज वाटली पाहिजे, असा व्हिडिओ तिने शेअर केला आणि त्यानंतर तिच्यावर टीका होऊ लागली.
पाक फॉलोअरसोबतच्या पोस्टवरून वादाला सुरूवात
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोशल मीडियावर शर्मिष्ठाचे लाखो फॉलोअर्स आहेत. त्यापैकी एक पाकिस्तानचा देखील चाहता आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर या पाकिस्तानी फॉलोअरने शर्मिष्ठा पानोलीला एक प्रश्न विचारला होता. 14 मे 2025 रोजी शर्मिष्ठाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्या फॉलोअर्सचे उत्तर देणारा व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये तिने एका विशिष्ट धर्मावर टिप्पणी केली होती.
व्हिडिओ शेअर अन् विशिष्ट धर्माचे लोक संतापले
व्हिडिओ शेअर होताच एका विशिष्ट धर्माचे लोक शर्मिष्ठावर रागावले. तिच्या अटकेच्या मागण्या वाढू लागल्या. तसेच काही वापरकर्त्यांनी शर्मिष्ठा पानोलीला मारण्याची आणि बलात्कार करण्याची धमकी दिली. तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर अशा धमक्यांचा पूर आला होता. शर्मिष्ठाने तिच्या सोशल मीडियावर या धमक्यांचे स्क्रीनशॉटही पोस्ट केले.
15 मे रोजी व्हिडिओ डिलीट केला अन् माफी मागितली
व्हिडिओला विरोध झाल्यानंतर आणि पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर, शर्मिष्ठाने सोशल मीडियावर माफी मागितली. शर्मिष्ठाने लिहिले - मी सर्वांची बिनशर्त माफी मागते. मी जे काही व्हिडिओमध्ये बोलले ते माझ्या वैयक्तिक भावना आहेत. माझा हेतू कोणालाही जाणूनबुजून दुखावण्याचा नव्हता. भविष्यात मी माझ्या सार्वजनिक पोस्टबद्दल काळजी घेईन. मला पुन्हा एकदा माफ करा.
धमक्यानंतर कुटुंबासह कोलकाता सोडले
सोशल मीडियावरून व्हिडिओ डिलीट करून माफी मागितल्यानंतरही, शर्मिष्ठाला कमेंटमध्ये धमक्या येत होत्या. सुरक्षेच्या कारणास्तव, शर्मिष्ठाने तिच्या कुटुंबासह कोलकाता सोडले आणि दिल्ली एनसीआरमध्ये आली. यासोबतच तिने पोस्ट केले की - पाकिस्तानला लक्ष्य केल्यामुळे कट्टरपंथी पाकिस्तानी दहशतवादी तिला लक्ष्य करत आहेत.
तक्रार कोलकाता पोलिसांपर्यंत पोहोचली
कोलकाता पोलिसांच्या गार्डनरिच पोलिस ठाण्यातही तक्रार पोहोचली. शर्मिष्ठा पानोली नावाच्या मुलीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे, ज्यामुळे एका विशिष्ट धर्माच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. मुलीवर कारवाईची मागणी करण्यात आली. त्यानंतर कोलकाता पोलिसांनी एफआयआर नोंदवला. यासोबतच शर्मिष्ठाला कायदेशीर नोटीसही पाठवण्यात आली.
कायदेशीर नोटीस न घेतल्याने अटक वॉरंट
कोलकाता पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, गुन्हा दाखल केल्यानंतर पानोली आणि तिच्या कुटुंबाला कायदेशीर नोटीस पाठवण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले परंतु ते गायब झाले. त्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण न्यायालयासमोर ठेवले. न्यायालयाने त्याचे अटक वॉरंट जारी केले. तेव्हा कोलकाता पोलिसांनी शुक्रवारी रात्री तिला गुरूग्राम येथून अटक केली.












Click it and Unblock the Notifications