पहिल्याच दिवशी 'छावा'ची छप्परफाड कमाई; इतके कोटी कमावले, 'या' चित्रपटांनाही टाकले मागे
Chhaava Box Office Collection Day 1 : छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र तथा धाकटे धनी अशी ओळख असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा सांगणारा लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेला बहुप्रतीक्षित 'छावा' चित्रपट शुक्रवार प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. विकी कौशल व रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना यांच्या मुख्य भूमिका असलेला 'छावा' प्रदर्शित झाल्यानंतर सगळीकडे या सिनेमाचीच चर्चा सुरू झालेली आहे. रिलीजपूर्वी एका सीनवरुन वादात आलेला हा चित्रपट पहिल्या दिवशी किती कमाई करेल असा प्रश्न होता. परंतु, या चित्रपटाने पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई केली आहे.
सिनेमातील ज्या पद्धतीचे डायलॉग आहेत, ते पाहून प्रेक्षकही भारावून जात आहेत. 'छावा' चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत. चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक सोशल मीडियावर पोस्ट करून चित्रपट खूपच चांगला असल्याच्या भावना व्यक्त करत आहेत. विकी कौशल, अक्षय खन्ना, रश्मिका मंदाना यांच्यासह इतर कलाकारांचं काम जबरदस्त असल्याची दिसून येत आहे. एकूणच हा चित्रपट पाहून प्रेक्षक भारावले आहेत. या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली, त्याचा आकडा देखील आता समोर आला आहे.

पहिल्या दिवशी किती झाली कमाई?
अॅडव्हान्स बुकिंगमधून चित्रपटाने चांगली कमाई केलेली होती. त्यानंतर आता पहिल्या दिवसाच्या कमाईची आकडेवारी समोर आली आहे. इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कने दिलेल्या वृत्तानुसार, 'छावा'ने पहिल्या दिवशी 31 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ही प्रारंभिक आकडेवारी आहे. अधिकृत आकडेवारी समोर आल्यानंतर यात काही अंशी बदल देखील असू शकतो.
या चित्रपटांनाही टाकले मागे?
या वर्षाच्या सुरुवातीला इमर्जन्सी, आझाद हा चित्रपट प्रदर्शित झाले. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी या चित्रपटांनी अनुक्रमे 2.5 कोटी आणि 1.5 कोटी रुपयांची कमाई केली, या दोन्ही चित्रपटांना पहिल्या दिवसाच्या कमाईच्या बाबतीत छावाने मागे टाकले.यासह या वर्षी प्रदर्शित झालेल्या स्काय फोर्सच्या ओपनिंग डेच्या कलेक्शनलाही (12.25 कोटी) या चित्रपटाने मागे टाकले आहे. देवा चित्रपटाने पहिल्या दिवशी 5.5 कोटी रुपये कमवले होते. या चित्रपटालाही छावा चित्रपटाने कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे. त्याचबरोबर लव्हयापा आणि बॅडएस रवीकुमार हे चित्रपट प्रदर्शित झाले होते. या चित्रपटांनी अनुक्रमे 1.25 कोटी आणि 2.75 कोटी रुपये कमवले होते. या चित्रपटांनाही छावा चित्रपटाने पहिल्या दिवसाच्या कमाईच्या बाबतीत मागे टाकले. दाक्षिणात्त्य सुपरस्टार नागा चैतन्यचा थंडेल हा चित्रपट आला होता. या चित्रपटाने पहिल्या दिवशी एकूण 11.5 कोटी रुपये कमवले होते. या चित्रपटाच्या कमाईलाही छावा चित्रपटाने मागे टाकले आहे.












Click it and Unblock the Notifications