बॉलिवूडवर पुन्हा बिश्नोई गँगचे सावट! रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार अन् 5 बड्या सेलिब्रिटींना धमकी
Bishnoi Gang Bollywood : बॉलिवूडमध्ये सध्या दहशतीचे वातावरण पसरले आहे. तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा फरार सहकारी शुभम लोणकर यांनी आता आपला मोर्चा चित्रपटसृष्टीतील इतर बड्या सेलिब्रिटींकडे वळवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, किमान पाच प्रमुख सेलिब्रिटींना खंडणीसाठी धमकीचे फोन आले आहेत. मात्र, बिश्नोई गँगच्या दहशतीमुळे अद्याप एकाही स्टारने अधिकृत तक्रार दाखल करण्याचे धाडस दाखवलेले नाही.

रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार: केवळ 'ट्रेलर' की मोठा कट?
गेल्या रविवारी प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या बंगल्यावर अज्ञातांनी गोळीबार केला. या घटनेने संपूर्ण सिनेसृष्टी हादरली आहे. पोलिसांच्या मते, या गोळीबाराचा मुख्य उद्देश पैसे उकळण्यासोबतच संपूर्ण चित्रपटसृष्टीत भीती निर्माण करणे हा होता.
पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनेक सेलिब्रिटींना धमक्या येऊनही ते पोलिसांशी संपर्क साधण्यास कचरत आहेत. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, "जर पीडित व्यक्तींनी तथ्य लपवले, तर गुन्हेगारांवर कठोर कारवाई करणे कठीण होते. सेलिब्रिटींनी पुढे येऊन तक्रार द्यायला हवी."
"पुढची गोळी छातीत लागेल"; शुभम लोणकरची सोशल मीडिया पोस्ट
या गोळीबाराची जबाबदारी फरार गुन्हेगार शुभम लोणकर याने घेतल्याचे समजते. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत रोहित शेट्टी आणि बॉलिवूडला थेट इशारा दिला आहे. लोणकरने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की:
"राम-राम, जय बजरंगबली. आम्ही रोहित शेट्टीला अनेक वेळा मेसेज करून आमच्या कामात हस्तक्षेप करू नका असे सांगितले, पण तो समजला नाही. हे फक्त एक 'ट्रेलर' होते. जर त्याने तरीही ऐकले नाही तर पुढची गोळी त्याच्या घराबाहेर नाही तर थेट त्याच्या छातीत लागेल. हा संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीला इशारा आहे: तुमचे मार्ग सुधारा."
विशेष म्हणजे, खुद्द रोहित शेट्टी यांनी त्यांना कोणताही धमकीचा फोन आल्याचा इन्कार केला आहे, ज्यामुळे तपासात गुंतागुंत निर्माण झाली आहे.
दहशतीमागील मूळ हेतू: पैसा आणि वर्चस्व
यापूर्वी बिश्नोई टोळीने सलमान खान, मुनावर फारुकी आणि बाबा सिद्दीकी यांना लक्ष्य केले होते. त्यावेळी काळवीट प्रकरण किंवा दाऊद इब्राहिमशी कथित संबंध अशी कारणे दिली जात होती. मात्र, आता रोहित शेट्टी आणि इतर ५ सेलिब्रिटींना दिलेल्या धमक्यांमागे केवळ 'खंडणी' (Extortion) आणि मुंबईवर गुन्हेगारी वर्चस्व मिळवणे हाच मुख्य हेतू असल्याचे पोलिसांचे प्राथमिक मत आहे.
पोलीस तपास आणि पथके रवाना
रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळीबार करणाऱ्या शूटर्सचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी देशाच्या विविध भागांत विशेष पथके पाठवली आहेत. या शूटर्सच्या अटकेनंतरच या कटामागील मास्टरमाईंड आणि मूळ उद्देशाचा अधिकृत खुलासा होऊ शकणार आहे. सध्या चित्रपटसृष्टीतील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून, पोलिसांनी सेलिब्रिटींना न घाबरता सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.












Click it and Unblock the Notifications