अल्लू अर्जुनच्या अडचणी काही थांबेना; आता काँग्रेस नेत्याची तक्रार, 'पुष्पा'च्या त्या सीनवरुन वाद
Allu Arjun : एकीकडे साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा चित्रपट पुष्पा 2 बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डवर रेकॉर्ड मोडत आहे. तर दुसरीकडे हा चित्रपट सतत वादात सापडला आहे. आता अल्लू अर्जुनच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. चित्रपटातील एका दृश्याबाबत काँग्रेस नेत्याने तक्रार करून आक्षेप घेतला आहे.
मुळात काँग्रेस नेते आणि तेलंगणाचे आमदार थिनामर मल्लान्ना यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार आणि अभिनेता अल्लू अर्जुन तसेच प्रॉडक्शन टीमविरोधात तक्रार दाखल केली आहे. हा वाद चित्रपटातील एका दृश्याबाबत आहे. ज्यात अल्लू अर्जुन स्विमिंग पूलमध्ये लघुशंका करताना दाखविला गेला आहे.

काँग्रेस नेत्याने पुष्पा 2 च्या या दृश्याला अपमानास्पद म्हटले आहे. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी हे निषेधार्ह असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी आपल्या तक्रारीत चित्रपटाचे दिग्दर्शक आणि संपूर्ण टीमवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 4 डिसेंबर रोजी हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये चित्रपटाच्या प्रीमियरदरम्यान झालेल्या वादानंतर ही तक्रार दाखल करण्यात आली, त्यामुळे अल्लू अर्जूनसमोर पुन्हा नवा वाद उभा राहिला आहे.
काय झाले होते संध्या थिएटरमध्ये?
अल्लू अर्जुन चाहत्यांना भेटण्यासाठी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये गेला होता. यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा मुलगाही गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या त्यांच्या मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. तो अजूनही कोमात आहे. या घटनेनंतर अल्लू अर्जुनला पोलिसांनी अटक केली. मात्र, काही तासांनंतर त्याला जामीन मिळाला. मात्र असे असूनही हे प्रकरण अद्याप शांत झालेले नाही.
आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
आता तेलंगणा पोलिसांनी अभिनेत्याला नवीन नोटीस जारी केली आहे, ज्यामध्ये त्याला मंगळवारी सकाळी 11 वाजता चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. दरम्यान, महिलेचा पती भास्कर याने अभिनेत्यावरील खटला मागे घेण्याचे संकेत दिले आहेत. याप्रकरणी अल्लू अर्जुनने सध्या मौन बाळगले आहे.












Click it and Unblock the Notifications