MSRTC Recruitment 2025 : एसटी महामंडळात तब्बल 17,450 पदांची मेगाभरती, कसा करावा लागेल अर्ज!
MSRTC Recruitment 2025 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) लवकरच बेरोजगार तरुणांसाठी रोजगाराची एक मोठी संधी घेऊन येत आहे.
भविष्यात एसटीच्या ताफ्यात समाविष्ट होणाऱ्या आठ हजार नवीन बसेससाठी आवश्यक मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन, महामंडळ १७,४५० चालक आणि सहाय्यक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवणार आहे. ही भरती कंत्राटी पद्धतीने तीन वर्षांसाठी असेल आणि यासाठीची ई-निविदा प्रक्रिया येत्या २ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.

भरती प्रक्रिया आणि वेतन
परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही भरती प्रक्रिया सहा प्रादेशिक विभागांनुसार राबवली जाईल. या प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना किमान ₹३०,००० इतके मासिक वेतन दिले जाईल.
महत्त्वाचे म्हणजे, महामंडळातर्फे या उमेदवारांना आवश्यक प्रशिक्षणही दिले जाणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.
कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ पुरवणाऱ्या संस्थांकडून महामंडळाला वेळेत आवश्यक कर्मचारी उपलब्ध होतील, अशी अपेक्षा आहे.
वाढती प्रवासी संख्या आणि नवीन बसेस लक्षात घेता, हे मनुष्यबळ मिळाल्यानंतर प्रवाशांना अखंडित, सुरक्षित आणि दर्जेदार बससेवा पुरवणे शक्य होईल, असेही मंत्री सरनाईक यांनी नमूद केले आहे.
राज्य सरकारच्या रोजगाराच्या निर्णयाला गती
एसटी महामंडळाच्या या घोषणेपूर्वी राज्य सरकारने पोलीस दलातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला होता. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर पोलीस भरतीलाही गती मिळाली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून भरती प्रक्रिया लांबल्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजी होती. मात्र, आता या दोन्ही मोठ्या भरती प्रक्रिया सुरू झाल्यामुळे तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्य सरकार रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर देत असल्याचे या निर्णयांमधून दिसून येते. या नव्या संधीचा फायदा घेऊन होतकरू तरुण-तरुणींनी या भरती प्रक्रियेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.












Click it and Unblock the Notifications