BMC Bharti 2026 : मुंबई पालिकेत नोकरीची सुवर्णसंधी! 9 हजार जागांसाठी संधी, जाणून घ्या प्रक्रिया!
BMC Nokar Bharti 2026 : मुंबई महानगरपालिकेत (BMC) सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई पालिकेत सध्या रिक्त पदांचा डोंगर साचला असून, प्रशासनाने आता ही पदे भरण्यासाठी कंबर कसली आहे. तब्बल ५६ हजारांहून अधिक पदे रिक्त असताना, त्यापैकी सुमारे ९,२९५ पदांची भरती प्रक्रिया सध्या वेगाने सुरू आहे.

मुख्यमंत्री आणि प्रशासनाचा मोठा निर्णय
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात 70 हजार पदांच्या मेगा भरतीची घोषणा केल्यानंतर, मुंबई महानगरपालिका प्रशासनानेही आपल्या रिक्त जागा भरण्याच्या हालचालींना वेग दिला आहे.
पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया राबवली जात असून, यामुळे मुंबईतील सुशिक्षित बेरोजगारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
रिक्त पदांचा लेखाजोखा: ५६ हजार जागा रिकाम्या!
मुंबई महानगरपालिकेच्या अवाढव्य कामाचा व्याप पाहता, कर्मचाऱ्यांची कमतरता प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरत आहे. अधिकृत आकडेवारीनुसार सद्यस्थिती खालीलप्रमाणे आहे.
- तपशील : संख्या
- एकूण मंजूर पदे : १,४५,२५६
- सध्या कार्यरत कर्मचारी : ८९,१३०
- एकूण रिक्त पदे : ५६,१२६
एवढ्या मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण येत आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी 'म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेने'ने प्रशासनाकडे ही भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची मागणी आवर्जून केली.
9 हजार पदांची भरती प्रक्रिया 'सुसाट'
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या सुरू असलेल्या ९,२९५ पदांच्या भरतीपैकी ५,४८६ पदांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरित ३,८०९ पदांच्या भरतीसाठी कागदपत्रांची पडताळणी आणि अन्य तांत्रिक प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहेत. ही पदे भरल्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर रिक्त जागांसाठीही जाहिराती प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.
प्रशासकीय आव्हाने आणि महसुली खर्च
नुकत्याच सादर झालेल्या पालिकेच्या अर्थसंकल्पात महसुली खर्च कमी करण्यावर भर देण्यात आला आहे. खर्च मर्यादित ठेवण्यासाठी काही अनावश्यक पदे कमी करण्याचे संकेत प्रशासनाने दिले असले, तरी अत्यावश्यक सेवा (उदा. आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता) या विभागांमधील पदे भरण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. नागरी सुविधांचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी ही 'मेगा भरती' पूर्ण करणे पालिकेसाठी अनिवार्य झाले आहे.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या टिप्स
अधिकृत संकेतस्थळ: भरती संदर्भातील सर्व अपडेट्ससाठी उमेदवारांनी portal.mcgm.gov.in या वेबसाईटला वेळोवेळी भेट द्यावी.
कागदपत्रे तयार ठेवा: शैक्षणिक पात्रता, जात प्रमाणपत्र आणि डोमिसाईल यांसारखी आवश्यक कागदपत्रे अद्ययावत ठेवावीत.












Click it and Unblock the Notifications