सोन्याचे भाव आज अचानक कोसळले; सोने आता खरंच ५५-६० हजारांच्या घरात येईल का?
मंगळवारी एक लाखांच्या घरात गेलेले सोन्याचे भाव आज बुधवारी अचानक कोसळले. अवघ्या काही तासांत सोन्याच्या किमतीत प्रतितोळा ३ हजार ९०० रुपयांची घट झाली. अमेरिका व चीनमधील व्यापारीक तणाव कमी होत असताना ही घसरण झाल्याचा अंदाज बांधला जात आहे. आता हा तणाव अजून निवळला तर सोन्याच्या किंमती अजूनही कमी होतील, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या तीव्र घसरणीनंतर, सोन्याची किंमत आता ५५ हजारांच्या पातळीवर येईल का? हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

सोने किती उतरले?
सोन्याच्या किमतीत आज मोठी घसरण दिसून आली. बुधवारी सकाळी ११:१५ वाजता सोन्याचा भाव १८०० रुपयांनी घसरून ९५,५३६ रुपयांवर आला. सकाळी सोने सुमारे १,००० रुपयांच्या घसरणीसह ९६,५०० रुपयांवर उघडले होते. व्यापार सुरु झाल्यावर सोन्याच्या किमती सुमारे १९०० रुपयांनी घसरून ९५,४५७ रुपयांच्या खालच्या पातळीवर पोहोचल्या. एप्रिल महिन्यात सोन्याच्या किमतीत ४,७०० रुपयांची वाढ झाली.
विक्रमी घसरण कशामुळे झाली?
सोन्याचा भाव कालपर्यंत ९९,३५८ रुपयांवर पोहोचला होता. आज सोन्याचा भाव ९५,४५७ रुपयांपर्यंत घसरला. सोन्याच्या किंमती प्रती दहा ग्रॅम ३,९०१ रुपयांनी घसरल्या. अमेरिका व चीन यांच्यातील व्यापारी तणाव कमी होत आहे. डॉलर निर्देशांकही वाढत आहे, त्यामुळेच ही घसरण झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सोन्याच्या किंमतीत अजूनही घट होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सोने ६० हजारांपर्यंत येईल का?
मॉर्निंग स्टारच्या अहवालात सोन्याच्या किमतीत मोठी घसरण होऊ शकते, असा अंदाज काही दिवसांपूर्वी सांगितला होता. ही घसरण ५५ ते ६० हजारांपर्यंत दिसून येईल, असेही काहींचे म्हणणे होते. आजची घसरण पाहिल्यानंतर सोन्याचा भाव ५५-६० हजारांपर्यंत येतील का, हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. येत्या काळात गुंतवणूकदारांकडून नफा बुकिंग सुरू राहू शकते. किंमती विक्रमी पातळीवर असल्याने भौतिक मागणी कमी होऊ शकते. अशा परिस्थितीत, किमतींमध्ये घसरण दिसून येईल असाही अंदाज बांधला जात आहे.
मॉर्निंग स्टारचा अहवाल काय?
मॉर्निंगस्टारच्या अहवालानुसार, सोन्याचे उत्पादन वाढले आहे. २०२४ च्या दुसऱ्या तिमाहीत खाणकामाचा नफा प्रति औंस ९५० डॉलर्सवर पोहोचला आहे. जागतिक साठा ९ टक्क्यांनी वाढून २,१६,२६५ टन झाला आहे. ऑस्ट्रेलियाने उत्पादन वाढवले आणि पुनर्नवीनीकरण केलेल्या सोन्याचा पुरवठाही वाढला आहे. अहवालात म्हटले आहे की, गेल्या वर्षी १,०४५ टन सोने खरेदी करणाऱ्या मध्यवर्ती बँकांच्या खरेदीत घट होऊ शकते. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या सर्वेक्षणानुसार केंद्रीय बँका त्यांचे सोन्याचे साठे ७१ टक्के कमी करण्याचा किंवा राखण्याचा विचार करत आहेत. या सर्व कारणांमुळे सोन्याच्या किमतीत मोठी घसरण दिसून येईल असे अहवालात म्हटले आहे.
अमेरिकी-चीन तणाव कमी होईल का?
डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतर त्यांनी काही अनपेक्षित निर्णय घेतले. त्याचा परिणाम जागतीक बाजारपेठेवर झाला. ट्रम्प चीनबरोबर एक व्यापारी करार करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा करार झाला तर चीन व अमेरिकेतली व्यापारी तणाव कमी होईल. त्याचा परिणाम थेट सोने बाजारावर होईल. चिनी वस्तूंवरील शुल्क कमी होऊ शकते. असे झाल्यास सोन्याचे दर पुन्हा कमी होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.












Click it and Unblock the Notifications