ट्रम्प टॅरिफचा भारतीय सराफा बाजारावर परिणाम; रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येलाच सोन्याच्या किमतीत वाढ!
gold and silver rate today 7 august : सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरांनी नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. सोन्याचा भाव प्रति तोळा 1 लाख रुपयांच्या पुढे गेला असून, 24 कॅरेट सोन्याचा दर 101,089 रुपयांवर पोहोचला आहे. चांदीनेही मोठी झेप घेतली असून तिचा भाव प्रति किलो 113,445 रुपये झाला आहे. जीएसटीसह 24 कॅरेट सोन्याचा दर 103,692 रुपये तर चांदीचा दर 116,983 रुपये आहे.
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या मालांवर अतिरिक्त शुल्क लादण्याचा घेतलेला निर्णय आणि त्याचा थेट भारतीय बाजारांवर झालेला परिणाम दिसून येत आहे. तर दुसरीकडे रक्षाबंधनाच्या पवित्र सणाच्या पूर्वसंध्येलाच सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने भावा बहीणींच्या सणातील सोने चांदी खरेदीवर निर्बंध लागणार आहेत.

दरांमधील अभूतपूर्व वाढ
गेल्या काही महिन्यांत सोने-चांदीच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. ३१ डिसेंबर २०२४ पासून सोन्याच्या दरात तब्बल २५,००० रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. त्यावेळी सोन्याचा दर ७५,७४० रुपये होता. त्याचप्रमाणे, चांदी २७,५५९ रुपयांनी महागली असून तिचा भाव ८६,०१७ रुपयांवरून ११३,४४५ रुपयांवर पोहोचला आहे.
इतर कॅरेटच्या सोन्याचे दरही वाढले आहेत
खालील दर इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) द्वारे जाहीर केले जातात. त्यानुसार,
- २३ कॅरेट सोने: प्रति तोळा १००,२६९ रुपये (जीएसटीसह १०३,२७७ रुपये)
- २२ कॅरेट सोने: प्रति तोळा ९२,२१६ रुपये (जीएसटीसह ९४,९८२ रुपये)
- १८ कॅरेट सोने: प्रति तोळा ७५,५४० रुपये (जीएसटीसह ७७,८०६ रुपये)
- १४ कॅरेट सोने: प्रति तोळा ६०,६५९ रुपये
दरवाढीची प्रमुख कारणे
सोन्याच्या दरातील या विक्रमी वाढीमागे अनेक महत्त्वपूर्ण कारणे आहेत:
१. वाढती मागणी
स्टॉकिस्ट आणि मोठ्या व्यापाऱ्यांकडून सोन्याची मागणी प्रचंड वाढली आहे. ही वाढलेली मागणी दरांना वर खेचते.
२. सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय
सध्या जागतिक आणि स्थानिक स्तरावर आर्थिक अनिश्चिततेचे वातावरण आहे. अशा वेळी, गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळतात. यामुळे सोन्याच्या खरेदीत वाढ झाली आहे.
३. आंतरराष्ट्रीय घडामोडी
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५०% टॅरिफ लावण्याची आणि इतर देशांवरही शुल्क वाढवण्याची धमकी दिली आहे. अशा प्रकारच्या जागतिक व्यापार तणावामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते, ज्यामुळे सोन्याचे भाव वाढतात.
भारतात सोन्याच्या दरांवर आयात शुल्क, कर, रुपया-डॉलर विनिमय दर आणि मागणी-पुरवठा यासारख्या घटकांचा परिणाम होतो. आपल्या देशात सोने केवळ गुंतवणूक नसून, लग्न आणि सणांच्या काळातही त्याचा मोठा वापर होतो, त्यामुळे या दरवाढीचा परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावरही होतो.
प्रमुख शहरातील आजचे सोन्याचे दर कसे आहेत?
- दिल्लीत, २४ कॅरेट सोन्याचा दर आता प्रति १० ग्रॅम १,०२,४९० रुपये झाला आहे. त्याच वेळी, २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९३,९६० रुपये झाला आहे.
- मुंबई आणि कोलकातामध्ये २४ कॅरेटचा दर १,०२,३४० रुपये झाला आहे आणि २२ कॅरेटचा दर प्रति १० ग्रॅम ९३,८१० रुपये झाला आहे.
- नोएडा आणि गाझियाबादमध्ये, २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९३,९६० रुपये झाला आहे. त्याच वेळी, २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,०२,४९० रुपये झाला आहे.
- पुण्यात आज सोन्याचा भाव २४ कॅरेट सोन्यासाठी प्रति ग्रॅम १०,२५५ रुपये, २२ कॅरेट सोन्यासाठी प्रति ग्रॅम ९,४०० रुपये आणि १८ कॅरेट सोन्यासाठी (ज्याला ९९९ सोने देखील म्हणतात) ७,६९१ रुपये प्रति ग्रॅम आहे. l












Click it and Unblock the Notifications