अदानींचा धमाका! 1000 कोटींचा 'NCD' अवघ्या 45 मिनिटांत हातोहात; गुंतवणूकदारांचा तुफान प्रतिसाद
Adani Enterprises bond issue : भारतीय बाजारपेठेत अदानी समूहाचा दबदबा पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडने (AEL) लाँच केलेला १००० कोटी रुपयांचा सार्वजनिक 'नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर' (NCD) इश्यू उघडल्यानंतर अवघ्या ४५ मिनिटांत पूर्णपणे सबस्क्राइब झाला. विशेष म्हणजे, ५०० कोटी रुपयांचा मूळ बेस इश्यू तर अवघ्या १० मिनिटांत पूर्ण झाला, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये या इश्यूसाठी असलेली चढाओढ अधोरेखित झाली.

45 मिनिटांत 1,000 कोटींचे संकलन
मंगळवारी सकाळी हा इश्यू गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. स्टॉक एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार, पहिली १० मिनिटात ५०० कोटी रुपयांचा बेस इश्यू पूर्णपणे सबस्क्राइब झाला. 'ग्रीनशू' पर्यायासह (अतिरिक्त ५०० कोटी) एकूण १,००० कोटी रुपयांचा आकडा पार झाला. हा इश्यू १९ जानेवारी २०२६ पर्यंत खुला राहणार असला तरी, 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वामुळे सुरुवातीच्या काही मिनिटांतच मोठी गुंतवणूक झाली.
गुंतवणूकदारांना आकर्षित करणारी वैशिष्ट्ये
अदानी एंटरप्रायझेसच्या या एनसीडीमध्ये गुंतवणूकदारांनी रस दाखवण्यामागे काही प्रमुख कारणे आहेत.
१. दमदार परतावा : हा इश्यू दरवर्षी ८.९० टक्क्यांपर्यंत प्रभावी परतावा देतो, जो सध्याच्या मुदत ठेवींच्या (FD) तुलनेत अधिक स्पर्धात्मक आहे.
२. सुरक्षितता आणि रेटिंग : आयसीआरए (ICRA) आणि केअर रेटिंग्जने या एनसीडीला 'AA-' (Stable) रेटिंग दिले आहे, जे गुंतवणुकीची सुरक्षा दर्शवते.
३. गुंतवणुकीचे पर्याय : २४, ३६ आणि ६० महिने अशा विविध कालावधीसाठी हे डिबेंचर उपलब्ध आहेत. यात त्रैमासिक, वार्षिक आणि संचयी व्याज देयकाचे पर्यायही देण्यात आले आहेत.
४. लिस्टिंग: हे एनसीडी बीएसई (BSE) आणि एनएसई (NSE) वर सूचीबद्ध केले जाणार आहेत, ज्यामुळे गुंतवणूकदारांना भविष्यात यात खरेदी-विक्री करणे सुलभ होईल.
पैशांचा विनियोग कुठे होणार?
कंपनीने स्पष्ट केल्यानुसार, या इश्यूमधून जमा होणाऱ्या निधीचा किमान ७५ टक्के हिस्सा सध्याचे कर्ज फेडण्यासाठी वापरला जाईल. उर्वरित रक्कम सामान्य कॉर्पोरेट कामांसाठी वापरली जाणार आहे. यामुळे कंपनीची ताळेबंद (Balance Sheet) अधिक मजबूत होण्यास मदत होईल.
अदानी समूहाचा वाढता विस्तार!
गुंतवणूकदारांच्या या प्रचंड विश्वासामागे अदानी समूहाने वेळेत पूर्ण केलेले मोठे प्रकल्प आहेत:
नवी मुंबई विमानतळ : ८ ऑक्टोबर २०२५ रोजी उद्घाटन होऊन २५ डिसेंबर २०२५ पासून हे विमानतळ कार्यान्वित झाले आहे.
विशाखापट्टणम डेटा सेंटर : गुगल आणि अदानीकनेक्स यांच्या भागीदारीत भारतातील सर्वात मोठे एआय (AI) डेटा सेंटर कॅम्पस विशाखापट्टणम येथे विकसित होत आहे.
रस्ते आणि रोपवे : सप्टेंबर २०२५ मध्ये नानासा-पिडगाव रस्ता प्रकल्प सुरू झाला. याशिवाय केदारनाथ रोपवे आणि बिहारमधील दोन महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांची कामेही कंपनीला मिळाली आहेत.
जुलै २०२५ मध्येही अदानींचा असाच एक इश्यू 3 तासांत पूर्ण झाला होता, पण यावेळी केवळ ४५ मिनिटांत मिळालेला प्रतिसाद हा समूहाच्या प्रतिमेत झालेली सुधारणा दर्शवतो.
नुवामा वेल्थ मॅनेजमेंट आणि ट्रस्ट इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर्स यांसारख्या मोठ्या संस्थांनी या इश्यूचे व्यवस्थापन केले आहे. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी भारताच्या पायाभूत सुविधांच्या विकासात सहभागी होण्याची ही एक मोठी संधी मानली जात आहे.












Click it and Unblock the Notifications