नव्या वर्षात खिशाला बसणार झळ की मिळणार दिलासा; 1 जानेवारीपासून बदलणार 'हे' 10 मोठे नियम!
January 1 2026 rule changes : उद्यापासून अर्थात नवीन वर्षाला सुरुवात होत आहे. उद्यापासून म्हणजेच १ जानेवारीपासून केवळ कॅलेंडर बदलणार नाही, तर तुमच्या दैनंदिन जीवनाशी निगडित अनेक महत्त्वाचे आर्थिक आणि सरकारी नियमही बदलणार आहेत.
१ जानेवारी २०२६ पासून पगार, कर, बँकिंग आणि अगदी सोशल मीडिया वापरण्यापर्यंतचे नियम बदलत असून, त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. जर तुम्ही ३१ डिसेंबरपर्यंत आवश्यक तयारी केली नाही, तर तुम्हाला दंड किंवा आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागू शकतो.

जाणून घेऊया नवीन वर्षात होणारे 10 मोठे बदल :
1. पॅन-आधार लिंकसाठी शेवटची संधी
३१ डिसेंबर २०२५ ही पॅन आणि आधार लिंक करण्याची अंतिम मुदत आहे. १ जानेवारीपासून ज्यांचे पॅन कार्ड आधारशी लिंक नसेल, ते निष्क्रिय (Inoperative) होऊ शकते. यामुळे बँकिंग व्यवहार, आयकर परतावा (Refund) आणि सरकारी योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी येतील. तसेच, उशिरा लिंक केल्यास ₹१,००० दंड भरावा लागेल.
2. आठवा वेतन आयोग: पगार आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ
सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी घेऊन येणार आहे. ८ वा वेतन आयोग १ जानेवारीपासून लागू होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे अंदाजे ५० लाख कर्मचारी आणि ६९ लाख पेन्शनधारकांच्या मूळ पगारात २० ते ३५ टक्क्यांची वाढ होऊ शकते. डीए (DA) आणि एचआरए (HRA) मध्येही मोठी सुधारणा अपेक्षित आहे.
3. नवीन आयकर (ITR) फॉर्म
जानेवारी २०२६ मध्ये प्राप्तिकर विभाग नवीन ITR फॉर्म जारी करण्याची शक्यता आहे. या फॉर्ममध्ये तुमच्या बँक व्यवहारांची आणि खर्चाची अधिक सविस्तर माहिती द्यावी लागेल. उत्पन्न आणि खर्चात तफावत आढळल्यास कर विभागाची नोटीस येण्याचा धोका वाढू शकतो.
4. नवीन आयकर कायदा (Income Tax Act)
सरकार १९६१ चा जुना आयकर कायदा बदलून अधिक सोपा आणि पारदर्शक नवीन कायदा आणण्याच्या तयारीत आहे. हा कायदा १ एप्रिल २०२६ पासून पूर्णपणे लागू होऊ शकतो, परंतु त्याचे नियोजन आणि अंमलबजावणीचे संकेत १ जानेवारीपासूनच मिळण्यास सुरुवात होईल.
5. पीएम-किसान योजनेसाठी 'शेतकरी ओळखपत्र'
शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा बदल म्हणजे, आता PM-Kisan चा लाभ घेण्यासाठी 'शेतकरी ओळखपत्र' अनिवार्य केले जात आहे. ज्या शेतकऱ्यांकडे हे कार्ड नसेल, त्यांना वार्षिक ६,००० रुपयांचा हप्ता मिळण्यास विलंब होऊ शकतो.
6. क्रेडिट स्कोअर आता दर आठवड्याला अपडेट होणार
कर्ज घेणाऱ्यांसाठी हा मोठा बदल आहे. २०२६ पासून तुमचा क्रेडिट स्कोअर (CIBIL) दर महिन्याऐवजी दर ७ दिवसांनी अपडेट केला जाईल. यामुळे जर तुम्ही वेळेवर हप्ता भरला तर फायदा लगेच दिसेल, पण एक जरी हप्ता चुकला तरी त्याचा फटका काही दिवसांतच बसेल.
7. बँकांचे व्याजदर आणि FD मधील बदल
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच SBI, HDFC आणि PNB सारख्या मोठ्या बँका मुदत ठेव (FD) आणि कर्जाच्या व्याजदरात बदल करू शकतात. गुंतवणूक करणाऱ्यांसाठी किंवा नवीन कर्ज घेणाऱ्यांसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरेल.
8. LPG सिलिंडरच्या किमतीत सुधारणा
दर महिन्याच्या १ तारखेला गॅस सिलिंडरचे दर बदलतात. १ जानेवारी २०२६ रोजी घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरच्या नवीन किमती जाहीर होतील. जागतिक बाजारपेठेतील कल पाहता, सिलिंडरच्या दरात ३०-४० रुपयांची घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
9. व्हॉट्सअॅप आणि टेलिग्रामवर कडक निर्बंध
डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी केंद्र सरकार मेसेजिंग अॅप्ससाठी नवीन नियमावली आणत आहे. आता व्हॉट्सअॅप वापरण्यासाठी तुमचा नंबर किमान ९० दिवस सक्रिय असणे आवश्यक असू शकते. तसेच, सुरक्षा कारणास्तव 'वेब व्हर्जन' दर सहा महिन्यांनी आपोआप लॉग-आउट होईल.
10. पेट्रोल-डिझेल आणि विमान प्रवास
१ जानेवारीला विमान इंधनाचे (ATF) दर सुधारले जातील. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी राहिल्यास विमान तिकिटे स्वस्त होऊ शकतात. तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींबाबतही सरकार काही मोठी घोषणा करण्याची शक्यता नाकारता येत नाही.












Click it and Unblock the Notifications