Yash Dayal: आरसीबीचा गोलंदाज यश दयालच्या अडचणी वाढल्या: रेप केस अन् कोर्टाने दिला झटका!
Yash Dayal Latest News : आरसीबीचा स्टार गोलंदाज यश दयालच्या अडचणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. जयपूरमध्ये दाखल झालेल्या बलात्काराच्या प्रकरणात राजस्थान उच्च न्यायालयाने त्याला अटकेपासून दिलासा देण्यास नकार दिला आहे. या प्रकरणात अल्पवयीन पीडितेचा समावेश असल्याने, सध्या तरी न्यायालयीन हस्तक्षेप करणे योग्य होणार नाही, असे न्यायमूर्ती सुदेश बन्सल यांच्या खंडपीठाने म्हटले आहे. तर दुसरीकडे, न्यायालयाने पोलिसांना पुढील सुनावणीसाठी २२ ऑगस्ट रोजी केस डायरी सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

गंभीर आरोपांची मालिका!
यश दयालवर एका १९ वर्षीय मुलीने बलात्काराचा आरोप केला आहे. ती दोन वर्षांपूर्वी १७ वर्षांची असताना क्रिकेट जगताच्या माध्यमातून यश दयालच्या संपर्कात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दयालने तिच्या क्रिकेट कारकिर्दीत मदत करण्याचे आश्वासन देऊन तिच्यावर पहिल्यांदा बलात्कार केला. त्यानंतर, २०२५ च्या आयपीएल हंगामात तो जयपूरमध्ये असताना त्याने तिला एका हॉटेलमध्ये बोलावून पुन्हा बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.
पहिली घटना पीडित मुलगी अल्पवयीन असताना घडल्यामुळे, या प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (बलात्कार) सह लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पोक्सो) कायद्याच्या तरतुदी लागू करण्यात आल्या आहेत.
खंडणी टोळीचा आरोप!
यासंदर्भात यश दयालने अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली होती. त्याचे वकील कुणाल जैमन यांनी दावा केला आहे की दयालला खंडणी टोळीने लक्ष्य केले आहे.
त्यांनी असा युक्तिवाद केला की गाझियाबादमध्ये दाखल झालेल्या अशाच एका एफआयआरला अलाहाबाद उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर अवघ्या एका आठवड्यात जयपूरमध्ये ही तक्रार दाखल करण्यात आली. यामुळे, हे प्रकरण एक सुनियोजित कट असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र, न्यायालयाने हा युक्तिवाद सध्या तरी स्वीकारलेला नाही.
या प्रकरणाच्या पुढील सुनावणीत पोलीस केस डायरी सादर केल्यानंतरच या प्रकरणाला नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे. या प्रकरणाच्या पुढील घडामोडींकडे क्रिकेटप्रेमी आणि कायदेतज्ज्ञांचे लक्ष लागून आहे.












Click it and Unblock the Notifications