Who is Divya Deshmukh : वर्ल्ड चेस चॅम्पियनशीपमध्ये दिव्या देशमुख ठरली विश्वविजेती! कोण आहे ती? वाचा
Who is Divya Deshmukh : जॉर्जीयात बटुमी इथं सुरू असलेल्या फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत भारताच्या कोनेरु हंपी हिला पराभूत करुन भारताच्याच दिव्या देशमुख हिने विजय मिळवला. या विजयासह ती पहिली भारतीय विश्वविजेती ठरली आहे. खास बाब म्हणजे ती अवघ्या १९ वर्षांचीच आहे.
अंतिम सामन्यात ३८ वर्षीय कोनेरू हम्पीला तिने हरवले, जॉर्जियातील बटुमी येथे सोमवारी झालेल्या दुसऱ्या रॅपिड टाय-ब्रेकर सामन्यात दिव्याने काळ्या मोहऱ्या वापरून हम्पीला हरवून मुकुट पटकावला आहे. विशेष बाब म्हणजे भारताच्या इतिहासात या स्पर्धेतील विजेता आणि उपविजेता हे भारतीयच बनले आहेत. दिव्या देशमुख एक विक्रम स्थापन करणार असून आज आपण तिच्याबद्दल जाणून घेऊया.

कोण आहे दिव्या देशमुख
दिव्या देशमुख ही भारतीय बुद्धिबळाच्या चौसष्ट घरांची राणी आहे. विशेषतः महिलांच्या गटात, मोठ्या आदराने तिचे नाव घेतले जाते. खास बाब म्हणजे ती महाराष्ट्रातील नागपूरची आहे. तिचा जन्म ९ डिसेंबर २००५ रोजी झाला असून ती अवघ्या २० वर्षांची आहे. या युवा बुद्धिबळपटूने अल्पावधीतच आपल्या चमकदार कामगिरीने जागतिक स्तरावर भारताचा झेंडा उंचावला आहे. तिला महिला ग्रँडमास्टर (WGM) आणि आंतरराष्ट्रीय मास्टर (IM) या दोन्ही प्रतिष्ठेच्या पदव्या मिळाल्या आहेत.
नागपुरात मराठी कुटुंबात जन्म
दिव्याचा जन्म नागपूर येथे एका मराठी कुटुंबात झाला. तिचे आई-वडील, जितेंद्र देशमुख आणि नम्रता देशमुख हे दोघेही डॉक्टर आहेत. दिव्याने आपले सुरुवातीचे शिक्षण नागपूरमधील भवन्स भगवानदास पुरोहित विद्या मंदिरातून घेतले, तिथे तिच्या बुद्धिबळाच्या प्रवासाची बीजे रोवली गेली.
दिव्याची दिव्य कामगिरी
- २०२१ मध्ये, दिव्याने एक महत्त्वाचा टप्पा गाठला. ती भारताची २१ वी महिला बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनली. तिच्या नावावर अनेक विक्रम जमा आहेत:
- तीन वेळा बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम तिने केला आहे.
- २०२० च्या FIDE ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या संघाचा ती एक महत्त्वाचा भाग होती.
- २०२२ मध्ये तिने महिला भारतीय बुद्धिबळ स्पर्धा जिंकली.
- २०२२ च्या बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये तिला वैयक्तिक कांस्यपदक मिळाले.
- आशियाई अजिंक्यपद, जागतिक ज्युनियर अजिंक्यपद तसेच जागतिक युवा अजिंक्यपद स्पर्धेत तिने अनेक सुवर्णपदके पटकावली आहेत.
आशियायी महिला बुद्धीबळ अजिंक्यपद जिंकलं
२०२३ हे वर्ष दिव्यासाठी विशेष ठरले. अल्माटी येथे तिने आशियाई महिला बुद्धिबळ अजिंक्यपद जिंकले. त्यानंतर टाटा स्टील इंडिया बुद्धिबळ स्पर्धेत सर्वात कमी सीडिंग असूनही, महिलांच्या रॅपिड विभागात तिने पहिले स्थान पटकावले. या स्पर्धेत तिने हरिका द्रोणवल्ली, वंतिका अग्रवाल, कोनेरू हम्पी, सविता श्री बी, इरिना क्रश आणि निनो बत्सियाश्विली यांसारख्या दिग्गज खेळाडूंना पराभूत केले, तर महिला विश्वविजेत्या जू वेंजुन आणि ॲना उशेनिना यांच्याविरुद्ध बरोबरी साधली.
२०२४ मध्येही 'दिव्य' घोडदौड
- २०२४ मध्ये मे महिन्यात, दिव्याने शारजा चॅलेंजर्स स्पर्धा जिंकली, ज्यामुळे तिला पुढील वर्षी शारजा मास्टर्समध्ये स्थान मिळाले. जूनमध्ये, ती २०२४ ची FIDE वर्ल्ड २० वर्षांखालील मुलींच्या स्पर्धेची विजेती बनली.
- २००१ मध्ये कोनेरू हम्पी, २००८ मध्ये हरिका द्रोणवल्ली आणि २००९ मध्ये सौम्या स्वामीनाथन यांच्यानंतर जागतिक ज्युनियर मुलींचे विजेतेपद जिंकणारी ती चौथी भारतीय ठरली.
- अंतिम फेरीत विजयाची गरज असताना, तिने बल्गेरियाच्या बेलोस्लावा क्रॅस्टेवाला पाच तासांच्या दीर्घ लढतीत हरवून संभाव्य ११ पैकी १० गुण मिळवले आणि सुवर्णपदक जिंकले.
भारताची दुसऱ्या क्रमांकाची महिला बुद्धीबळपटू
सप्टेंबर २०२४ मध्ये, तिने ४५ व्या बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये सांघिक सुवर्ण तसेच वैयक्तिक सुवर्णपदके जिंकून पुन्हा एकदा आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली. डिसेंबर २०२४ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, दिव्या देशमुख भारतातील दुसऱ्या क्रमांकाची महिला बुद्धिबळपटू आहे.












Click it and Unblock the Notifications