विनेश फोगटला न्याय मिळवून देण्यासाठी हरीश साळवे मैदानात, सीएसएमध्ये आज होणार सुनावणी
Vinesh Phogat : पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम सामन्यापूर्वी भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटला अपात्र ठरवण्यात आले. तिचे वजन 100 ग्रॅम जास्त असल्याने तिला 50 किलो फ्रीस्टाइल प्रकारात अपात्र ठरवण्यात आले, त्यामुळे तिचे ऑलिम्पिक पदक हुकलं.
मात्र आता हे प्रकरण न्यायालयात पोहोचले आहे. या निर्णयाविरोधात भारतीय ऑलिम्पिक संघटनेने क्रीडा लवादाच्या न्यायालयात धाव घेतली आहे. देशातील ज्येष्ठ वकील हरीश साळवे भारताच्या वतीने विनेश फोगट यांची बाजू मांडणार आहेत.
हरीश साळवे हे देशातील ज्येष्ठ वकील असून त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय खटल्यांमध्ये भारताचे यशस्वीपणे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे त्यांचा अनुभव या बाबतीत भारतासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे.

हरीश साळवे हे देशाचे माजी सॉलिसिटर जनरलही राहिले आहेत. सीएएसमध्ये भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे प्रतिनिधित्व करणार असल्याचे त्याने निश्चित केले आहे. या प्रकरणाची सुनावणी आज पॅरिसच्या वेळेनुसार सकाळी 9 वाजता भारतीय वेळेनुसार दुपारी 12.30 वाजता होणार आहे.
पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगटने गुरुवारी कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली होती. इंस्टाग्रामवर एका भावनिक पोस्टमध्ये तिने म्हटलं होतं की, "आई, कुस्ती जिंकली, मी हरलेय, माफ करा मला, तुझे स्वप्न, माझे धैर्य सर्व काही संपलंय, माझ्याकडे यापेक्षा जास्त ताकद नाही. अलविदा कुस्ती 2001-2024, मी तुम्हा सर्वांचा सदैव ऋणी राहीन, माफ करा."
फोगटच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंग यांनी विनेशने आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, ही घोषणा घाईघाईने करण्यात आल्याचे दिसते. भारतात परतल्यावर तिने तिच्या निवृत्तीबाबत कुटुंब, महासंघ आणि इतर क्रीडा अधिकाऱ्यांशी चर्चा करावी.












Click it and Unblock the Notifications