महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा! राड्यानंतरच्या थरारक सामन्यात मोहोळ विजयी; वाचा, नेमकं काय-काय झालं
अहिल्यानगर येथे सुरु असलेल्या ६७ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत राडा झाला. त्यानंतर झालेल्या अंतिम लढतीत पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ हा 67 वा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. पृथ्वीराज मोहोळ याने सोलापूरचा पैलवान महेंद्र गायकवाड याचा अंतिम सामन्यात अत्यंत थरारक पद्धतीने पराभव केला. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना हा अतिशय रंगतदार ठरला.

कसा झाला अंतिम सामाना
अंतिम सामना अतिशय थरारक झाला. पृथ्वीराजने योग्य संधी साधत पहिला गुण मिळवला. त्यानंतर महेंद्रने एक गुण मिळवत सामन्यात बरोबरी केली. पण त्यानंतर पृथ्वीराजने महेंद्रला चितपट करत असताना त्याला थेट रिंगणाच्या बाहेर ढकललं. यामध्ये पृथ्वीराजला आणखी एक गुण मिळाला. अखेर वेळ संपल्याने पृथ्वीराज मोहोळ हा विजयी ठरला. यानंतर त्याच्या समर्थकांनी मैदानात जोरदार जल्लोषाला सुरुवात केली.
मोहोळ विरुद्ध गायकवाड
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना सायंकाळी उशीरा झाला. तत्पूर्वी गादी विभागामधून नांदेडचा शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ तसेच माती विभागातून सोलापूरचा महेंद्र गायकवाड विरुद्ध परभणीचा साकेत यादव यांच्यात उपांत्य सामने पार पडले. गादी गटातून पृथ्वीराज मोहोळ अंतिम सामन्यात पोहोचला. तर माती गटातून महेंद्र गायकवाड हा अंतिम सामन्यात पोहोचला. यानंतर महेंद्र गायकवाड आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात अंतिम सामन्याचा थरार रंगला.
राड्यानंतर अजित पवारांची हजेरी
उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थित हा थरारक अंतिम सामना पार पडला. अहिल्यानगरमधील वाडिया पार्क मैदानात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यातील उपांत्य फेरीनंतर कार्यक्रमात मोठा गोंधळ उडाला होता. शिवराज राक्षे याने पराभवानंतर पंचांना लाथ मारली होती. त्यामुळे मोठा राडा झाला होता. या राड्यानंतर थोड्या वेळाने अंतिम सामना खेळवण्यात आला.












Click it and Unblock the Notifications